रवि राणा यांचा सवाल, महापालिका आयुक्तांच्या दालनात जंबो बैठक
अमरावती : महापालिकेचे कचरा संकलन केंद्र (कम्पोस्ट डेपो) बडनेरा मतदार संघातच हा असा प्रश्न निर्माण केला जात आहे. लोकसंख्येच्या तुलनेत कचरा संकलन केंद्र निर्माण करावे. बडनेरा मतदार संघातील नागरिकांच्या आरोग्याचा विचार करून या विषयाला स्थगिती द्यावी, अशा सूचना आमदार रवि राणा यांनी गुरुवारी महापालिका प्रशासनाला दिल्या.
आयुक्त प्रशांत रोडे यांच्या दालनात काही महत्त्वपूर्ण अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आ. राणा यांनी जंबो बैठक घेतली. त्यांच्या मते काही दिवसांपूर्वी महापालिका आमसभेत सर्वाधिक कचरा संकलन केंद्र हे बडनेरा मतदारसंघातच निर्माण करण्याला प्राधान्य देण्यात आले. खरे अमरावती, बडनेरा मतदारसंघातील लोकसंख्येच्या तुलनेत कचरा संकलन केंद्र निर्माण झाले पाहिजे, अशा सूचना त्यांनी केल्यात. केवळ बडनेरा मतदारसंघातच कचरा संकलन केंद्र निर्माण करण्यामागे हेतू काय, असा प्रश्न आ. राणांनी उपस्थित केला. बडनेरा मतदार संघात जास्त कम्पोस्ट डेपो निर्माण करून नागरिकांच्या आराेग्याशी हा खेळ असल्याचा आक्षेप त्यांनी घेतला. बडनेरा मतदार संघात कचरा संकलन केंद्राचा प्रस्ताव मंजूर होत असताना बडनेऱ्यातील नगरसेवक झोपा काढत होते, असा आरोप आ. राणा यांनी केला. आमसभेतील हा प्रस्ताव स्थगित झाला नाही तर, तीव्र आंदोलन उभे केले जाईल, असा ईशारा त्यांनी दिला आहे. यावेळी शिक्षण सभापती आशिषकुमार गावंडे, अजय मोरय्या, सुमती ढोके, अजय जयस्वाल, लईक अहमद, अब्दूल रशिद खान, सिद्धार्थ बनसोड, विजय मलिक, मंगेश चव्हाण, सैय्यद मोबीन आदींंनी कैफियत मांडली.