धारणी : आदिवासी विकास महामंडळाच्या ऑनलाईन खरेदी नोंदणीबाबत भरडधान्य उत्पादकांना वंचित ठेवण्यात आले आहे. शासनाने १९ मे रोजी धान उत्पादकांना ऑनलाइन नोंदणीकरिता ३१ मे पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. परंतु, हे नियम भरडधान्य उत्पादकांना नसल्याचे प्रादेशिक व्यवस्थापक नरेंद्र रणमाळे यांनी लोकमतशी बोलताना स्पष्ट केले.
कोरोनाच्या अनुषंगाने आदिवासी विकास महामंडळाद्वारे रबी हंगामातील धान्य ऑनलाईन खरेदी करण्यासाठी ३० एप्रिल रोजीची शेवटची मुदत दिली होती. परंतु या कालावधीत अनेक शेतकऱ्यांना तलाठी उपलब्ध झाले नसल्यामुळे रबी हंगामातील पेरेपत्रकात नोंद करण्यात आली नसल्याने त्यांना ३० एप्रिलपर्यंत ऑनलाईन नोंदणी करता आली नाही. शासनाने ऑनलाईन नोंदणीबाबतचे पोर्टल ३० एप्रिल रोजी बंद केल्यामुळे मेळघाटातील गहू व मका उत्पादकांना यंदा आपले धान्य विकण्यासाठी शेतकऱ्याच्या दावणीला बांधण्याचा घाट रचण्यात आल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.
विशेष म्हणजे अनेक व्यापाऱ्यांनी बोगस शेतकऱ्यांचे सातबारा उतारा प्राप्त करून आदिवासी विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून आपले सातबारा ऑनलाईन खरेदीसाठी अपडेट केल्याची माहिती आहे. धाणाप्रमाणे जेव्हा-केव्हा नवीन आदेश प्राप्त होईल तेव्हा वंचित शेतकरी ऑनलाइन नोंदणीकरिता येईल, असे सांगितले. मात्र, त्यांनी याकरिता शासनाकडे कोणताही प्रस्ताव पाठविला नसल्यामुळे यंदा अनेक शेतकरी आदिवासी महामंडळात धान्य विक्री करण्याऐवजी व्यापाऱ्यांच्या दावणीला बांधले जातील, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.