लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : पन्नास वर्षांपूर्वीचे बांधकाम असलेल्या शाळेच्या आवारातील पडक्या व जीर्ण खोल्यांच्या दुरुस्तीचा मुद्दा पालकांनी काही दिवसांपूर्वी शाळेत झालेल्या बैठकीत मांडला होता. त्याची शाळा व्यवस्थापनाने दखल घेतली नाही. अखेर शुक्रवारी तीच जीर्ण भिंत अंगावर कोसळून एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला, तर तिघे जखमी झाले. ही बाब शाळा व्यवस्थापनाचा हलगर्जीपणा अधोरेखित करणारी असून, या गंभीर प्रकारासाठी शाळा व्यवस्थापनातील अधिकारी व पदाधिकाऱ्यांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा का नाही, असा प्रश्न उपस्थित करीत आहे.आ. बच्चू कडू यांच्या शिक्षण संस्थेतील आष्टी येथील मणीबाई छगनलाल देसाई विद्यालय परिसरातील जीर्ण खोल्यांची भिंत कोसळून वैभव गावंडेचा मृत्यू झाला, तर त्याचे तीन वर्गमित्र गंभीर जखमी झालेत. पन्नास वर्षांपूर्वी शाळेच्या आवारात टिनाच्या दोन खोल्या बांधण्यात आल्या होत्या. प्रथम त्या जागेचा उपयोग शाळेचे संस्थापक अध्यक्ष मनसुखलाल देसाई यांनी गायींच्या गोठ्यासाठी केला होता. त्यानंतर शालेय साहित्य ठेवण्यासाठी गोदाम म्हणूनही त्या खोल्यांचा वापर झाला. कालांतराने या शाळेच्या संचालकाची जबाबदारी आ. बच्चू कडू यांच्याकडे आली. वसु महाराज या शाळेचे अध्यक्ष बनले. यादरम्यान या खोल्यांचे टिन गायब झाले अन् राहिल्या केवळ भिंती.गेल्या कित्येक वर्षांपासून या पडक्या भिंतीच्या आतील जागा ही लघुशंकेकरिता उपयोगात आणली गेली. इतक्या जुन्या बांधकामातील या भिंती केव्हाही कोसळेल, याची जाणीव प्रत्येकालाच होती. विद्यार्थ्याच्या मृत्यूनंतर जीर्ण भिंतीचा विषय प्रत्येकाच्या तोंडून ऐकायला मिळाला. या शिकस्त, पडक्या खोल्यांबद्दल शाळा व्यवस्थापन व व्यवस्थापन समिती अनभिज्ञ कशी राहू शकते, असा प्रश्न यानिमित्त निर्माण झाला. काही महिन्यांपूर्वीच शाळेत पालकांची बैठक बोलाविण्यात आली होती. त्यावेळीसुद्धा पालकांनी जीर्ण खोल्यांचा मुद्दा प्रकर्षाने मांडला होता. एक तर या भिंती पाडून टाका किंवा दुरुस्ती करा, अशी मागणी केली होती. मात्र, शाळा व्यवस्थापनाला जीर्ण खोल्यांचा मुद्दा क्षुल्लक वाटला. त्यांनी दुर्लक्षच केले. त्याची परिणती एका शाळकरी मुलाच्या अकाली मृत्यूत झाली आहे.शुक्रवारी दुपारी याच पडक्या खोलीची स्वच्छता करण्यासाठी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना पाठविले होते. भिंती जीर्ण झाल्याचे मुख्याध्यापकांसह शिक्षकांना माहिती असतानाही, त्यांनी विद्यार्थ्यांना तेथे का पाठविले, असाही प्रश्न उपस्थित झाला आहे. या गंभीर प्रकाराकडे दुर्लक्ष करणाºया शाळा व्यवस्थापनातील दोषींवर खरे तर सदोष मनुष्यवधाचाच गुन्हा नोंदवायला हवा, असा सूर विद्यार्थ्यांच्या नातेवाइकांच्या आक्रोशामध्ये दिसून येत होता. शाळेच्या हलगर्जीपणाची दखल शिक्षणाधिकारी घेतील का, दोषींविरुद्ध कारवाई करतील का, असा प्रश्न यानिमीत्ताने उपस्थित झाला आहे.
सदोष मनुष्यवधाचा गुन्हा का नाही?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2019 11:33 PM
पन्नास वर्षांपूर्वीचे बांधकाम असलेल्या शाळेच्या आवारातील पडक्या व जीर्ण खोल्यांच्या दुरुस्तीचा मुद्दा पालकांनी काही दिवसांपूर्वी शाळेत झालेल्या बैठकीत मांडला होता. त्याची शाळा व्यवस्थापनाने दखल घेतली नाही. अखेर शुक्रवारी तीच जीर्ण भिंत अंगावर कोसळून एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला, तर तिघे जखमी झाले. ही बाब शाळा व्यवस्थापनाचा हलगर्जीपणा अधोरेखित करणारी असून, या गंभीर प्रकारासाठी शाळा व्यवस्थापनातील अधिकारी व पदाधिकाऱ्यांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा का नाही, असा प्रश्न उपस्थित करीत आहे.
ठळक मुद्देशिक्षण खाते करणार का कारवाई? : पडक्या भिंतीबाबत शाळा प्रशासनाला केले होते अवगत