अमरावती : आमदार रवी राणा व खासदार नवनीत राणा यांनी मुख्यमंत्र्यांच्या मातोश्रीवर हनुमान चालिसा वाचू, असा इशारा दिला होता. त्यानंतर राणा दाम्पत्याने मुंबईतील आंदोलनाची तारीखही जाहीर केली. हनुमान चालिसा वाचण्याला मुख्यमंत्र्यांचा इतका विरोध का? असा सवाल देखील खासदार नवनीत राणा यांनी उपस्थित केला.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बाळासाहेबांच्या विचारांचा विसर पडला आहे. शिवसैनिक आम्हाला तारीख देतील याची वाट आम्ही पाहिली. मात्र, त्यांच्याकडून कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे आम्ही दिवस आणि वेळ ठरवली असून आम्ही मातोश्रीवर जाऊन हनुमान चालिसा वाचणार. आम्ही लोकप्रतिनिधी आहोत, दहशतवादी नाही. यामुळेच आम्ही तिथे जाऊन दंगल घडवणार नाही. आम्ही शांततेच्या मार्गाने मातोश्रीवर देवाचे नामस्मरण करणार आहोत, असेही खासदार नवनीत राणा म्हणाल्या.
अत्यंत श्रद्धेनं अमरावती ते मातोश्री अशी वारी करु - रवी राणा
आमदार रवी राणा म्हणाले, हनुमान जयंतीच्या दिवशी हनुमान चालिसा पठण करण्याची विनंती आम्ही मुख्यमंत्र्यांना केली होती. पण याचा त्यांनी विरोध केला, मातोश्री हे आमचं श्रद्धास्थान आहे. आम्ही अत्यंत श्रद्धेनं अमरावती ते मातोश्री अशी वारी करु व कितीही विरोध झाला तरी शांतपणे जाऊन हनुमान चालीसाचे वाचन करु, वेळ असल्यास मुख्यमंत्र्यांनीही आम्हला मोठ्या मनाने साथ द्यावी. हनुमान चालिसा पठणाद्वारे त्यांना जागृत करणे हाच आमचा मातोश्रीवारीचा उद्देश असल्याचे रवी राणा यांनी स्पष्ट केले.
दादा भुसे म्हणाले..
कोणत्या विषयाला आपण किती महत्व द्यायचे हे ठरविण्याची गरज आहे. आज महागाई, बेरोजगारीसारख्या प्रश्नांवर लक्ष देण्याची गरज आहे. हे प्रश्नांना बगल देऊन नौटंकी करण्याऱ्या प्रश्नांना महत्व द्यायचे का? असा प्रश्न दादा भुसे यांनी उपस्थित केला.