अमरावती : राज्य परिवहन महामंडळाने काेरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर पूर्ण क्षमतेने प्रवासी वाहतुक सुरू केली आहे. यात लालपरी, विठाई, शिवशाही, रातराणी, आदी लांब, मध्यम आणि साध्या बसेस सुरू केल्या आहेत. मात्र, ग्रामीण भागात अजूनही एसटी बसेस दर्शन दुर्लभ आहे. ग्रामीण भागातील एसटी बसेस बंद असल्याने अनेक प्रवाशांना ऑटोरिक्षा किंवा अन्य खासगी वाहनाने प्रवास करावा लागत आहे. जिल्ह्यात एसटीची प्रवासी सेवा सुरू झाली असली, तरी अनेक बस गाड्या आगारातच उभ्या आहेत. ग्रामीण भागात प्रवाशांचा प्रतिसाद कमी असल्याने काही फेऱ्या बंद असल्याचे एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. दुसरीकडे एसटी बसेस बंद असल्याने प्रवासी मात्र खासगी बसने प्रवास करीत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
बॉक्स
खेडेगावात जाण्यासाठी ऑटोरिक्षाचा आधार
जिल्ह्यात एसटी महामंडळाचे आठ आगार आहेत. यामध्ये परतवाडा, दर्यापूर, चांदुर बाजार, मोर्शी, वरूड, चांदूर रेल्वे, अमरावती आणि बडनेरा या आगारांचा समावेश आहे.
विशेष म्हणजे ग्रामीण भागात वाहतूक करणाऱ्या अनेक आगारांनी प्रवासी वाहतुकीसाठी दिवसा साेडल्या जाणाऱ्या फेऱ्या व रात्री मुक्कामी बसेस अद्याप सुरू केलेल्या नाहीत.
जिल्ह्यात आठही आगारांमधून बहूतांश बसेस या शहरी भागातच सोडल्या जात आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातून शहरात येणाऱ्या प्रवाशांना मात्र बसेस बंद असल्याने खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे.
बॉक्स
६७ हजार किलोमीटरचा प्रवास
एसटी महामंडळाकडून सोडल्या जात असलेल्या गाड्यांचा गत अडीच महिन्यांतील प्रवास दरदिवसाला ६७ हजार किलोमीटर होत आहे. मात्र, यातील बहूतांश वाहतूक ही शहरी भागातच होत आहे. काेरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर महामंडळाला ८ कोटी २० लाखांचे उत्पन्न मिळाले आहे.
बॉक़्स
आगारातील एकूण बसेस - ३७९
कोरोनाआधी दररोज होणाऱ्या फेऱ्या - १६९०
सध्या सुरू असलेल्या फेऱ्या - ९५०
कोट
ग्रामीण भागातून सुरुवातीला एसटी बसेसला अपेक्षित असा प्रतिसाद मिळत नाही. मात्र, आता टप्प्याटप्प्याने प्रवाशांचा प्रतिसाद पाहून एसटी बसेसची वाहतूक सुरू केली जाईल.
श्रीकांत गभणे
विभाग नियंत्रक
बॉक्स
खेडेगावांवरच अन्याय का?
कोट
कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर शहरानंतर ग्रामीण भागातही एसटी बसेस सुरू होणे अपेक्षित होते. मात्र, अद्याप बसेस सुरू नसल्याने नाइलाजास्तव खासगी वाहनाने प्रवास करावा लागत आहे.
सहदेव मानकर
प्रवासी
कोट
कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यानंतर परिस्थिती पूर्वपदावर येत आहे. अशातच ग्रामीण भागात शेतकरी वर्ग शेतीच्या कामात व्यस्त आहे. अशातच महत्त्वाच्या कामासाठी शहरात जावे लागते. परंतु, बसेस बंद असल्याने जादा पैसे देऊन ऑटोरिक्षाने प्रवास करावा लागत आहे.
रवींद्र बागडे, प्रवासी