वांझोटे सोयाबीन बियाणे : पूर्णानगर परिसरातील शेतकऱ्यांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रारगजानन मोहोड - अमरावतीउगवणशक्ती नसलेले महाबीजचे सोयाबीन बियाणे प्रमाणिकरण करणाऱ्या परभणी येथील ‘त्या’ कृषी अधिकाऱ्याविरुध्द निलंबनासह फौजदारी कारवाई का नाही? असा सवाल या लॉटमधील वांझोट्या बियाण्यांमुळे फसवणूक झालेल्या पूर्णानगर परिसरातील संतप्त शेतकऱ्यांनी केला आहे. याच मागणीचे निवेदन जिल्हा दौऱ्यावर असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आले आहे.महाराष्ट्र शासनाची अंगीकृत कंपनी असणाऱ्या महाबीजचे लॉट क्रमांक ४०३४, ४००९ व ४०१६ मधील ३५५ या जातीचे बियाणे पूर्णानगर, वातोंडा, मार्की, अंचलवाडी, येलकी, मिर्झापूर, वाकी, सावळापूर, उमरटेक गावातील शेतकऱ्यांनी पूर्णानगर येथील सुमित कृषी सेवा केंद्रामधून घेतले. पेरणी पश्चात हे बियाणे उगवणशक्ती नसलेले स्पष्ट झाल्यावर शेतकऱ्यांनी तक्रारी दाखल केल्यात. नमुन्यांची शासकीय प्रयोगशाळेत चाचणी झाली. यामध्ये बियाणे वांझोटे असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाणे अपेक्षित असताना ती मिळाली नाही. त्यामुळे या परिसरातील शेतकरी संतप्त झाले आहेत.वांझोट्या सोयाबीनच्या लॉटसाठी महाराष्ट्र राज्य बीज प्रमाणिकरण यंत्रणा, अकोला यांनी १७ फेब्रुवारी २०१४ रोजी मुक्तता अहवाल (रिलीज आॅर्डर) दिली आहे. हे बियाणे महाराष्ट्र राज्य बीज प्रमाणिकरण यंत्रणेच्या परभणी येथील ओ.आय. खान या कृषी अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीने प्रमाणित करण्यात आले आहे. या बियाण्यांची उगवणक्षमता या अधिकाऱ्याने ७१ टक्के दर्शविली आहे. नागपूर येथील प्रयोगशाळेत ही उगवणक्षमता केवळ ११ टक्केच असल्याचे अहवालात उल्लेख आहे. उगवणशक्ती नसताना बियाणे प्रमाणिकरण करणाऱ्या या अधिकाऱ्यामुळेच शेतकऱ्यांचा खरीपाचा हंगाम वाया गेला.
निलंबनासह फौजदारी का नाही?
By admin | Published: November 29, 2014 11:11 PM