१० वर्षांपासून संघर्ष : वनविभागाकडून नोकरी, आर्थिक मदत नाहीअमरावती : वनविभागाचा हत्ती भोला याने चिरडून ठार मारलेल्या माहुताच्या पत्नीचा १० वर्षांपासून न्यायासाठी संघर्ष सुरू आहे. या वन कर्मचाऱ्याच्या वारसांना नोकरी व वनविभागाकडून देण्यात येणारी ५ लाखांवर भरपाई मिळाली नसल्याची शोकांतिका आहे. वनविभागाच्या सेमाडोह येथे भोला नामक हत्तीचे माहूत म्हणून सुरेंद्रसिंग सेंगर हे काम करीत होते. १५ मार्च २००५ रोजी नेहमीप्रमाणे हत्तीला रस्त्याने आणून झाडाला बांधत असताना हत्तीने पिसाळून या माहुताला दोन वेळा उचलून फेकले. यात त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या हत्तीलादेखील वनविभागाने गोळ्या घालून ठार केले होते. सेंगर कर्तव्यावर असताना हत्तीने ठार मारल्याने त्यांच्या वारसांना सहाय्यतार्थ ५० हजारांचा धनादेश वनविभाग अचलपूर येथे जमा करण्यात आला. तो अद्यापही त्यांच्या वारसाला मिळालेला नाही. मृताची पत्नी हेमलता सेंगर ह्या इंदोर येथे राहत असल्याने अन्य महिलेनेदेखील या रकमेवर पत्नी म्हणून द्यावा केला होता. परंतु न्यायालयात सदर महिलेने आपत्ती घेऊन प्रकरण निपटविले. वनविभागाने न्यायालयाचे आदेश मागविले असता मृत माहुताची पत्नी हेमलता यांनी १८ आॅगस्ट २०१४ च्या न्यायालयाचा आदेश वनविभागाला दिला. मात्र याला एक वर्ष पार पडले असताना वनविभागाकडून त्यांना रक्कम मिळाली नाही. तसेच सेंगर यांच्या वारस मुलगी दीपा व मुलगा दीपक यांना अनुकंपा तत्त्वावर नोकरी दिलेली नाही. तसेच वनविभागाव्दारा मंजूर ५० हजार, देहावसन खर्च १० हजार व कुटुंबाला अर्थसहाय्य ४ लाख ५० हजार रुपये अजूनही देण्यात आलेले नाहीत. वनविभागाने माहुताच्या वारसांना नोकरीत सामावून कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी शासकीय मदत द्यावी, अशी मागणी मृताची पत्नी हेमलता सेंगर यांनी केली आहे. (प्रतिनिधी)
हत्तीने चिरडलेल्या माहुताच्या पत्नीची न्यायासाठी भटकंती
By admin | Published: January 23, 2016 12:39 AM