वरूड : पत्नीने दुसरे लग्न करू नये, तिने आपल्यासोबतच राहावे, अशी आपली भावना होती. मात्र ती सोबत राहण्यास नकार देत असल्याने आपण तिच्या हत्येच्या निर्णयाप्रत पोहोचल्याची खळबळजनक कबुली आरोपी पती दीपक राजेंद्र जिचकार (२९ रा. सावंगी, ह.मु. टेंभूरखेडा) याने दिली आहे.
माहेरी आलेल्या पत्नीची मोबाईल चार्जरच्या केबलने गळा आवळून हत्या करण्यात आल्याची घटना तालुक्यातील टेंभुरखेडा येथे ४ फेब्रुवारी रोजी दुपारच्या सुमारास घडली. अंकिता दीपक जिचकार (२३ रा. सावंगी, ह.मु. टेंभूरखेडा) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी वरूड पोलिसांनी आरोपी पती दीपक राजेंद्र जिचकार याला अटक केली. अटकेदरम्यान त्याने पत्नीच्या खुनाची कबुली दिली. दरम्यान, त्याला न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली. अंकिता व दीपकचा जुलै २०१९ मध्ये प्रेमविवाह झाला. परंतु काही दिवसांपासून एकमेकांमध्ये वाद होत असल्याने अंकिता ही माहेरी आई वडिलांकडे टेंभुरखेडा येथे वास्तव्यास होती. सासरी आरोपीची ये-जा होती. आरोपी हा कुठलाच कामधंदा करत नसल्याने संसार कसा चालवायचा, यावरून दोघांमध्ये वाद झडत होते. आरोपीच्या दारुचे व्यसनाने त्या वादात तेल ओतले. त्यामुळे ती माहेरी परतली. आरोपी देखील पत्नीच्या माहेरी येऊन राहायला लागला. मात्र तेथेही वाद होत असल्याने तो एकदोन दिवसाआड तेथे जायचा. पतीच्या नेहमीच्या त्रासाला कंटाळून तिने विभक्त होण्याचा निर्णय त्याला सुनावला. ती घटस्फोटाच्या निर्णयापर्यंत पोहोचली. मात्र, दीपक अंकितापासून वेगळा होऊ इच्छित नव्हता, अशी कबुली त्याने पोलिसांकडे दिली.
आरोपीच्या खिशात विषाची फुटलेली शिशी
पोलिसांनी ४ फेबु्रवारी रोजी रात्री आरोपीला पुसला येथून अटक केली. त्यावेळी पोलिसांना विषाचा वास आला. त्याची झडती घेतली असता, त्याच्या खिशात विषारी द्रव्याची फुटलेली शिशी आढळली. त्याने विष प्राशन केले की काय, या शंकेवरून पोलिसांनी त्याला रात्रभर शासकीय रुग्णालयात देखरेखीखाली ठेवले. तथा शुक्रवारी त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात आले.
कोट
आरोपीने खुनाची कबुली दिली आहे. न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली.
- संघरक्षक भगत,
तपास अधिकारी, पोलीस ठाणे, वरूड