फोटो पी ०५ वरूड फो्डर
वरूड : माहेरी आलेल्या पत्नीची मोबाईल चार्जरच्या केबलने गळा आवळून हत्या करण्यात आली. ही खळबळजनक घटना तालुक्यातील टेंभुरखेडा येथे ४ फेब्रुवारी रोजी दुपारच्या सुमारास घडली. अंकिता दीपक जिचकार (२३ रा. सावंगी, ह.मु. टेंभूरखेडा) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी वरूड पोलिसांनी आरोपी पती दीपक राजेंद्र जिचकार (२९ रा. सावंगी, ह.मु. पुसला) याला अटक केली. कौटुंबिक वादातून ही घटना घडल्याचे पोलिसांनी सांगितले.
अंकिता व दीपकचा एक वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला. परंतु काही दिवसांपासून एकमेकांमध्ये वाद होत असल्याने अंकिता ही माहेरी आई वडिलांकडे टेंभुरखेडा येथे वास्तव्यास होती. सासरी आरोपीची ये-जा होती. दरम्यान आरोपी दीपकने अंकिताच्या बहिणीच्या साक्षगंधाला विरोध केल्याने तिच्या आई वडिलांनी दीपकला घरातून काढून दिले होते. ' मी एका एकाला पाहून घेईन ' अशी धमकी देऊन तो गावी परतला.
दरम्यान ४ फेब्रुवारी रोजी दीपक टेंभुरखेडा येथे पोहोचला. तेथे दुपारी घरात कोणी नसल्याची संधी साधून त्याने पत्नी अंकिता हिची गळा आवळून हत्या केली. गुरुवारी दुपारी ४ वाजताच सुमारास तिचे आईवडील घरी येताच ही घटना उघडकीस आली. या घटनेची फिर्याद मृताची लहान बहीण अमृता सुधाकर अळसपुरे (२२ रा. टेंभूरखेडा) हिने वरूड पोलीस ठाण्यात दिली. यावरून जरुड बिट जमादार मनोज कळसकर यांनी घटनास्थळ घाटहून पंचनामा केला
घटनेनंतर आरोपी पसार
पत्नीची हत्या केल्यानंतर आरोपी दीपक जिचकारने टेंभुरखेड्याहून पळ काढला. रात्री ९ च्या सुमारास तक्रार दाखल करून घेतल्यानंतर वरूड पोलिसांनी आरोपीचा शोध घेऊन त्याला पुसला येथून रात्री ९ च्या दरम्यान अटक केली. त्याचेविरुद्ध भादंविचे कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. घटनास्थळाला उपविभागीय पोलीस अधिकारी कविता फडतरे, ठाणेदार प्रदीप चौगावकर, एपीआय संघरक्षक भगत यांनी भेट दिली.