चांदूर रेल्वे (अमरावती) : तालुक्यातील पळसखेड येथे गुरुवारी पहाटे दाेनच्या सुमारास अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पतीचा पत्नी आणि सासऱ्याने गळा दाबून खून केला. याप्रकरणी चांदूर रेल्वे पोलिसांनी या दोघांविरुद्ध गुरुवारी उशिरा रात्री गुन्हा दाखल केला.
पोलिस सूत्रांनुसार, अमोल रमेश काकडे (३२, रा. पळसखेड) असे मृताचे नाव आहे, तर शीतल अमोल काकडे आणि भगवंत सहदेव राऊत (६०) असे आरोपी पत्नी व सासऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी धाकटा बंधू प्रफुल्ल रमेश काकडे (३०) याने चांदूर रेल्वे पोलिस ठाण्यात फिर्याद नोंदविली. त्यानुसार, अमोल हा अमरावती येथे दस्तुरनगरात हॉटेल चालवित होता, तर त्याची पत्नी शीतल ही महावितरणमध्ये चांदूर रेल्वे येथे वायरमन आहे. ती माहेरी पळसखेड येथे राहत होती. त्यामुळे अमोलदेखील अमरावती येथे कुटुंबीयांसमवेत राहण्याऐवजी पळसखेड येथून ये-जा करीत होता. त्यांच्या सोबतीला शीतलचा पिता भगवंत राऊतदेखील होता.
अनैतिक संबंधाच्या संशयातून वाद
शीतलचे अन्य पुरुषाशी अनैतिक संबंध असल्याचा संशय अमोल काकडे हा वारंवार व्यक्त करीत होता. यामुळे या दोघांमध्ये वारंवार खटके उडायचे. घटनेच्या चार महिन्यांपूर्वी पती- पत्नीचा वाद झाला, तेव्हा प्रफुल्ल पळसखेड येथे गेला होता. त्यावेळी शीतल व भगवंत यांनी अमोलला जिवे मारण्याची धमकी दिली होती.
अमितला कॉल, भाऊ उठत नाही
अमोल व प्रफुल्ल काकडे यांचा धाकटा भाऊ अमित (२८) याच्या मोबाइलवर गुरुवारी पहाटे पावणेतीनच्या सुमारास शीतलने कॉल केला. अमोल रात्री झोपेतून उठला आणि पाणी पिऊन पुन्हा झोपला तो उठतच नाही व हालचालदेखील करीत नाही, असे तिने सांगितले. त्यामुळे प्रफुल्लने पहाटे साडेचार वाजता पळसखेड गाठले तेव्हा अमोल मेला होता. त्यावेळी त्याच्या गळ्यावर ओरखडे असल्याचे प्रफुल्लने तक्रारीत नमूद केले.
गळा दाबल्याने खून
चांदूर रेल्वे येथील शासकीय रुग्णालयात अमोलचा मृतदेह प्रफुल्लने आणला. शवविच्छेदनात त्याचा गळा दाबल्याने मृत्यू झाल्याचा अहवाल तेथील डॉक्टरांनी दिला. ठाणेदार सतीश पाटील यांच्या मार्गदर्शनात पुढील तपास सुरू आहे.