अमरावती: कोरोना उपचार घेत असताना सकाळी जिवंत असलेल्या पतीचा सुपर स्पेशालिटी (कोविड रुग्णालयात) सायंकाळी अचानक मृत्यू झाल्याने ही बाब मृताच्या पत्नीला व नातेवाइकांना कळताच पत्नीने रुग्णालयाबाहेर टाहो फोडत गोंधळ घातला, तसेच पीपीई किटमध्ये गुंडाळलेला मृतदेह खोलून दाखविण्याची मागणी केली; मात्र नियमानुसार मृतदेह दाखविता येणार नाही, अशी भूमिका कोविड प्रशासनाने घेतल्याने अखेर गाडगे नगर पोलिसांना पाचारण करण्यात आले. ही घटना गुरुवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास घडली.
३५ वर्षीय पतीचा मृत्यू झाल्याची माहिती पत्नीला मिळताच पत्नी व मृताच्या नातेवाइकांनी कोविड रुग्णालयात धाव घेतली. तिने टाहो फोडत मृतदेह खोलून दाखवा, अशी मागणी केली; मात्र कोविड नियमानुसार मृतदेह दाखविता येणार नाही. असे डॉक्टरांनी सांगितले; मात्र माहिला आरडाओरड करीत होती. ऐकायला तयार नव्हती. त्यामुळे काही वेळ तणाव निर्माण झाला होता. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता. गाडगे नगरचे पोलीस निरीक्षक मोहन कदम यांच्यासह गाडगे नगर पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला. सदर मृत चाळीसगाव येथील असल्याची माहिती पोलिसांनी दिली. वृत्त लिहिस्तोवर मृतदेहावर अंत्यसंस्कार झाले नव्हते.
कोट
पतीच्या मृत्यूनंतर महिलेने मृतदेह पीपीई किटच्या बाहेर काढून दाखविण्याची मागणी केली; मात्र नियमानुसार तसे करता येत नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यानंतर सदर महिलेची समजूत काढण्यात आली.
मोहन कदम, पोलीस निरीक्षक गाडगे नगर.