संजय खासबागे।लोकमत न्यूज नेटवर्कवरूड : यावर्षी पाऊस कमी झाल्यामुळे जंगलातील पाणवठे आटले आहेत. त्यामुळे जंगातील हिंस्र प्राणी गावापर्यंत येण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत नागरिकांना सावध राहण्याचा इशारा वनविभागाने दिला आहे. आठवड्यापूर्वी तालुक्यातील एका शेतकऱ्याला वाघ दिसल्याची अफवा पसरली होती. वाघाबाबत ती अफवा असली तरी तडशा आणि अस्वलांच्या शिरकावाला वनविभागाने दुजोरा दिला होता. अस्वालाची हिंस्त्रता अनेकांनी अनुभवली आहे. तालुक्यातही अस्वलीने शेतकऱ्यांना जखमी केल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीदायक वातावरण निर्माण झाले आहे. दुसरीकडे नागरी वस्तीत शिरू पाहणाºया वन्यप्राण्यांचा अपघात होऊन ते मृत्यूच्या दाढेत ओढले जात आहेत.गेल्या काही दिवसांपासून दुष्काळ आणि पाणीटंचाई या विषयांवर बराच ऊहापोह सुरू आहे. निसर्गाचा समतोल साधून जीवनसाखळी सुरळित राहण्यासाठी मानवासोबतच प्रत्येक लहानमोठा जीव आवश्यक असतो. या साखळीत जंगलांमध्ये राहणारे प्राणी महत्त्वाची भूमिका बजावतात. पण, पाणीटंचाईचा फटका माणसांप्रमाणेच, कदाचित माणसापेक्षा जास्त बसतो तो या वन्य प्राण्यांना! उन्हाळयात जंगलातील पाणवठे आटणे ही वन्य प्राण्यांसाठी मृत्युघंटाच असते. पाण्याची जागा बदलली तर हे प्राणी मरतील, पण दुसरीकडे पाणी पिण्यास जाणार नाहीत. यावरून त्यांची पाणवठयांबाबतची संवेदनशीलता दिसून येते.मात्र नैसगिर्क पाणवठे आटले. कृत्रिम पाणवठ्यांसाठी वनविभागाकडे निधी नाही, अशा पेचात वन्यप्राण्यांच्या तृष्णेचा प्रश्न दुय्यम बनला आहे. तालुक्याला हजारो हेक्टरचे जंगल लाभले असून त्यात अनेक प्रकारचे पशूपक्षी आहेत. यंदा तालुक्यातील नऊ सिंचन प्रकल्प कोरडे पडण्याच्या मार्गावर आहेत. जंगलातील पाणवठे आटल्यामुळे पशूपक्षांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.जंगलातील प्राणी पाण्याच्या शोधात शिवारासह गावातही आगेकूच करीत असल्याने शेतकरी, शेतमजुरांमध्ये भीतीची वातावरण आहे.सातपुडा जंगलात वन्यप्राण्यांचा वावरमध्यप्रदेश-महाराष्ट्राच्या सीमेवर असलेल्या वरूड तालुक्यात सातपुडा पर्वत आणि मोठे जंगल परिक्षेत्र आहे. या जंगलात अस्वली, बिबट, रोही, रानडुक्कर, कोल्हा, हरिण, तडशा यासह इतरही हिंस्त्र वन्यप्राणी वास्तव्याला आहेत. यंदा अतितापमान आणि अत्यल्प पर्जन्यमानामुळे जंगलातील पाणवठे आटल्याने वन्यप्राण्यांनी गावाकडे कूच केली आहे.वन्यप्राण्यांकडून शेतीचेही नुकसानरोही, रानडुक्कर, कोल्हे शेतातील बागायती पिके तथा संत्राझाडांची मोठ्या प्रमाणात नासधूस होत असल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. तडशा व अस्वलींचे पदचिन्हे दिसून आल्याने रात्रीच्या ओलितावर परिणाम झाला आहे. तालुक्यातील वाई, पुसली, रवाळा, पंढरी, कारली, जामगाव, गव्हाणकुंड, पुसला, लिंगा करवार आदी परिसरात वन्यप्राण्यांचा हैदोस वाढल्याने शेतीचे नुकसान होत आहे.
वन्यजीव वळले नागरी वस्तीकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2019 11:15 PM
यावर्षी पाऊस कमी झाल्यामुळे जंगलातील पाणवठे आटले आहेत. त्यामुळे जंगातील हिंस्र प्राणी गावापर्यंत येण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत नागरिकांना सावध राहण्याचा इशारा वनविभागाने दिला आहे. आठवड्यापूर्वी तालुक्यातील एका शेतकऱ्याला वाघ दिसल्याची अफवा पसरली होती.
ठळक मुद्देजंगलातील पाणवठे आटले : वनविभागाकडून सजग राहण्याचे आवाहन