करारनाम्यावर चर्चा : रावसाहेब शेखावत, संजय खोडकेंंचे मत जाणून घेणारअमरावती : महापालिकेत काँग्रेस, राष्ट्रवादी फ्रंट यांची सत्ता असून माजी आ. रावसाहेब शेखावत, काँग्रेसचे प्रदेश सचिव संजय खोडके यांचे नेतृत्त्व आहे. मात्र, मार्च मध्ये होऊ घातलेल्या स्थायी समिती सभापती पदावरुन आतापासूनच रणकंदन सुरु झाल्याचे चित्र आहे. सभापती कोण होणार? हा वाद सोडविण्यासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांचा निर्णय अंतिम रहील, अशी माहिती पुढे आली आहे.काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस फ्रंट यांच्याकडे असलेल्या संख्याबळानुसार सहजतेने स्थायी समिती सभापती खेचून आणता येते. हल्ली महापौरपद हे राष्ट्रवादी फ्रंटचे नेते संजय खोडके यांच्या गटाकडे आहे. मात्र, संजय खोडके यांनी लोकसभा निवडणुकीतच राष्ट्रवादी पक्षासोबत दोन हात करुन हातावरचे घड्याळ बाजुला काढून ठेवले आहे. आता खोडके यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश घेऊन प्रदेश सचिवपदाची धुरा सांभाळली आहे. मागिल महापौर, उपमहापौर निवडणुकीच्या वेळी माजी आ. रावसाहेब शेखावत, संजय खोडके यांच्या लेखी करारानुसार खोडके गटाकडे महापौरपद तर उपमहापौर आणि स्थायी समिती सभपतिपद रावसाहेब शेखावत गटाकडे देण्याचा निर्णय झाला होता. स्थायी समिती सभापतीपद हे शेवटच्या वर्षी म्हणजे मार्च २०१६ ते मार्च २०१७ या कार्यकाळात प्रत्येकी सहा महिने देण्याबाबत लेखी करार शेखावत, खोडके या नेत्यांमध्ये झाला आहे. त्यामुळे मार्चमध्ये होऊ घातलेल्या निवडणुकीत स्थायी सभापती पद हे राष्ट्रवादी फ्रंटच्या वाट्याला जाईल, असे करारनाम्यानुसार संकेत आहेत. या करारनाम्याचे पालन व्हावे, यासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची मदत घेतली जाणार आहे. काँग्रेसमध्ये सभापतिपदासाठी लांबलचक यादी आहे. त्यामुळे पक्षनेता बबलू शेखावत यांना धडकी भरू लागली आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सोडविणार ‘स्थायी’ सभापतिपदाचा वाद?
By admin | Published: January 11, 2016 12:01 AM