- मनीष तसरेअमरावती : बळीराजाच्या पिके घरी येईपर्यंत त्यावर अनेक सकंटांना सामोरे जावे लागते. त्याला घाबरत नाही, पुन्हा लढेन आणि जिंकेन, अशी पोस्ट टाकणाऱ्या शेतकरीपुत्राला सातासमुद्रापलीकडूनही बळ मिळाले आहे. उच्चशिक्षित भूमिपुत्रांच्या तेथील ग्रुपने या शेतकऱ्याशी संपर्क साधून त्याच्यासाठी आर्थिक तजवीजही केली आहे.
आर्वी (जि. वर्धा) तालुक्यातील बेल्हारा तांडा येथील मनोज जाधव या पदवीधर शेतकऱ्याने स्वत:च्या शेतात वन्यप्राण्यांनी केलेल्या नुकसानीचा व वनविभागाच्या जाचक अटींमुळे होत असलेल्या अडचणींचा व्हिडीओ समाज माध्यमांवर चार दिवसापूर्वी टाकला होता. तो व्हिडीओ एमजीएचएस (मणीबाई गुजराती हायस्कूल) या व्हाट्सॲप ग्रुपवर आला. या शाळेत शिकलेले मूळचे अंजनगाव सुर्जी तालुक्यातील पांढरी येथील भूपेश कोकाटे अमेरिकेतील न्यू जर्सी राज्यातील प्रिन्स्टन या शहरात २३ वर्षापासून वास्तव्यास आहेत.
ग्रुपमध्ये आलेला मनोज जाधव याचा व्हिडीओ त्यांनी पाहिला आणि या कणा ताठ असलेल्या शेतकऱ्याला मदत करण्यासाठी ग्रुपमधील भारत तसरे या मित्रासोबत त्याचे नाव आणि पत्ता शोधला. व्हाट्स कॉलिंगद्वारे शहानिशा केली. यावेळी अमेरिकेतून भूपेश, अमरावती येथून भारत, तर आर्वीहून मनोज यांच्यात संवाद झाला. नैसर्गिक आपत्ती ही येतच राहते. त्यासाठी तू स्वत:ला संपवू नको. रबीसाठी पुन्हा उभा राहा आणि लढ, असे म्हणत या भूमिपुत्रांनी त्याची आर्थिक मदत केली आहे.