लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : बडनेराचे आमदार रवी राणा हे भाजपचे मित्रपक्ष असून त्यांची विकासात्मक कामे फार मोठी आहेत. खरे तर त्यांना मतदारसंघात प्रचार करण्याची गरजच नाही. कारण त्यांचे निवडणूक चिन्ह 'पाना' आहे, याच पान्याने येत्या काळात महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या डोक्याचे नट कसायचे आहे, अशी खरमरीत टीका भाजपचे नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी येथे केली.
महायुतीचे घटक पक्ष असलेल्या युवा स्वाभिमान पार्टीचे बडनेरा मतदारसंघाचे उमेदवार रवी राणा यांच्या प्रचारार्थ जाहीरसभेत ते मार्गदर्शक म्हणून बोलत होते. यावेळी मंचावर आमदार रवी राणा, खासदार तथा भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉ. अनिल बोंडे, गुजरात राज्याचे कॅबिनेट मंत्री ऋषिकेश पटेल, भाजपचे प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी, दिनेश सूर्यवंशी, प्रभुदास भिलावेकर, डॉ. गणेश खारकर, युवा स्वाभिमानचे राष्ट्रीय अध्यक्ष निळकंठ कात्रे, किरण पातुरकर, माजी महापौर किरण महल्ले, चरणदास इंगोले, गणेशदास गायकवाड, जयंतराव देशमुख, आत्माराम पटेल संजय हिंगासपुरे आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, राज्यात महायुती सरकारने अनेक लोकाभिमुख निर्णय घेत योजना सुरू केल्या आहेत. पण विरोधक लाडकी बहीण योजना बंद करण्यासाठी उच्च न्यायालयात गेले परंतु उच्च न्यायालयानेही महाविकास आघाडीचे हे षडयंत्र हाणून पाडले. त्यामुळे लोकहित कोणते सरकार जोपासते, याची जाणीव जनतेला झाली आहे. येत्या काळात सरकार आल्यास लाडक्या बहिणींना १५०० ऐवजी २१०० रुपये दिले जातील, त्याकरिता आशीर्वाद द्या, असे आवाहन त्यांनी केले. विधानसभा निवडणुकीत महायुतीत भाजपला १५२ जागा मिळाल्या. त्यापैकी ४ जागा इतर पक्षांना देण्यात आल्या असून त्यापैकी बडनेरा ही एक आहे. रवी राणा त्यांचं बोधचिन्ह पाना आहे. ते कोणाकोणाचे नट कसतील माहीत नाही आम्हालादेखील विरोधकांच्या डोक्याचे नट कसायचे आहे, त्यासाठी तुमच्या पान्याची आवश्यकता पडेल, असा टोलाही देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.
मुलीच्या शिक्षणाची चिंता करू नका; मुलींचे मामा मुंबईला आहेतआमच्या लाडक्या बहिणी आमच्या भाऊजींना सांगतात की, तुम्ही घरी बसा. मी तालुक्याला जिल्ह्याला जाऊन येते. तुम्ही जास्त पैसे खर्च कराल. दारू प्याल, असं सांगत सर्वात जास्त महिला अर्ध्या तिकीटमध्ये प्रवास करत आहे. महायुती सरकारने मुलींच्या शिक्षणाची सोय करून ठेवली आहे. लाडक्या बहिणींनो काळजी करू नका, मुलींचे मामा मुंबईला बसून आहे. त्यांनी प्राथमिक ते उच्च शिक्षणापर्यंत भाचीच्या शिक्षणाची सोय करून ठेवल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी महिलांना दिली.
फडणवीसांमुळेच बडनेरात विकासाची गंगाजळी : रवी राणाउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहकार्यामुळेच बडनेरा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आले असून येथे १०० प्रवेश निश्चित झाले आहे. १६०० कोटींतून ही ऐतिहासिक वास्तू नावारूपास येणार आहे. मेडिकल कॉलेज परिसरात येत्या काळात ४ ते ५ हजार लोकांना रोजगार मिळेल. बडनेरात ४५० कोटींतून रेल्वे बैंगन कारखाना, बडनेरा-अमरावती सिमेंट काँक्रिटीकरण मार्ग १९० कोटी, सांस्कृतिक भवन, उद्यान यासह अंजनगाव बारी आणि भातकुली तालुक्याचा चेहरामोहरा बदलला आहे. भातकुली येथे ७ कोटींतून तहसील कार्यालय, खोलापुरी गेट पोलिस ठाणे साकारले जात असून यासह अनेक विकासाची कामे मतदारसंघात झाल्याची माहिती रवी राणा यांनी दिली.
रवी भाऊ म्हणून मी तुमचा पाना मागितला? महायुती सरकारला बदनाम करण्याचे सर्व प्रकारचे प्रयत्न बंद झाले, तर विरोधक उच्च न्यायालयात गेले. उच्च न्यायालयानेही लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, असे खडसावून सांगितले. म्हणून रवी राणा आता तुमचा पाना द्या, या महाविकास आघाडी विरोधकांच्या डोक्याचे नट कसण्यासाठी द्या, असे म्हणत ना. देवेंद्र फडणवीस यांनी हल्ला चढविला.
आमचा एकच धर्म आहे महायुतीचा धर्म : देवेंद्र फडणवीस भाजपने महायुतीचा जो उमेदवार दिला आहे त्याच्या मागे उभे राहायचे आहे. बडनेरात रवी राणा, तर अमरावतीमध्ये सुलभा खोडके यांच्या मागे भाजपा उभी आहे. आमचा एकच धर्म आहे महायुतीचा धर्म तो प्रामाणिकपणे पाळायचा आहे, असे संबोधित करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बंडखोर उमेदवारांना समर्थन करणारे भाजपचे पदाधिकारी, कार्यकत्यांचे कान टोचल्याचे दिसून आले