अमरावती : कोरोनामुळे गतवर्षी विद्यार्थ्यांना शाळेत एन्ट्री घेता आली नाही. मात्र, शिक्षण विभागाच्या आदेशानुसार शाळा व्यवस्थापन समित्यांनी निर्णय घेतला आणि मुख्याध्यापक व शिक्षकांनी प्रत्येकी एक गणवेश घरपोच वितरण केले. आता कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत बालकांना संक्रमणाचा धोका असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे सन २०२१-२२ या वर्षीचे शैक्षणिक सत्र सुरू होईल की ऑनलाईन शिक्षण राहील, विद्यार्थ्यांना गणवेश मिळणार की नाही, याबाबत प्रश्न निर्माण झाला आहे.
समग्र शिक्षा अभियान अंतर्गत गतवर्षीपासून लाभार्थी विद्यार्थ्यांना शाळा व्यवस्थापन समितीस्तरावरूनच गणवेश उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील पहिली ते आठवीत शिक्षण घेत असलेल्या सर्व मुली, अनुसूचित जाती-जमातीची मुले तसेच दारिद्र्यरेषेखालील कुटुंबातील मुले अशा लाखो विद्यार्थ्यांना गणवेशाचे वाटप केले जाते. त्यासाठी कोट्यवधी रुपयांची तरतूदही केली जाते. शासनाकडून तत्त्वत: यासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे. यंदा २६ जूनपासून शालेय शिक्षण सुरू होणार असले तरी ऑगस्ट ते ऑक्टोबर या कालावधीत कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे ऑक्टोबरपर्यंत शाळा सुरू होण्याची शक्यता धूसरच आहे. त्यातच गणवेश वाटपाच्या प्रक्रियेसाठी दोन ते तीन महिन्यांचा कालावधी लागतो. आक्टोबरनंतर प्रक्रिया सुरू केली, तर जानेवारी-फेब्रुवारीत विद्यार्थ्यांना गणवेश मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना गणवेश द्यायचा असेल, तर त्यासाठी आतापासूनच पावले उचलणे आवश्यक असल्याचे विविध शिक्षक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
कोट
गतवर्षी विद्यार्थ्यांना देण्यासाठी गणवेश शाळांनी खरेदी केले. कोरोनामुळे विद्यार्थ्यांना एकच गणवेश उपलब्ध करून देण्यात आला. यंदा गणवेश खरेदीची तयारी आतापासून सुरू केली, तर त्याचे वाटप योग्य वेळेवर करता येईल.
राजेश सावरकर, राज्य प्रतिनिधी, प्राथमिक शिक्षक समिती