उज्वल भालेकर, अमरावती : राज्य शासनाने १७ जुलै २०२३ मध्ये राज्यातील नऊ जिल्ह्यांमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व त्याला संलग्नित ४३० खाटांच्या रुग्णालय सुरू करण्यास मंजुरी दिली होती. त्या अनुषंगाने वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याच्या हालचालीदेखील सुरू आहेत. परंतु, संबंधित वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये अजूनही आवश्यक टीचिंग स्टाफ, तसेच बायोमेट्रिक प्रणाली नसल्याची निरीक्षण राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोग (एनएमसी) ने नोंदविल्याची विश्ववसनीय माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. त्यामुळे पालघर वगळता इतर आठ वैद्यकीय महाविद्यालयाला अजूनही एक वर्षाची प्रतीक्षा करावी लागणार असून, ८०० विद्यार्थ्यांचे डॉक्टर बनण्याच्या स्वप्नांना ब्रेक लागण्याची भीती व्यक्त होत आहे.
जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यूएचओ) च्या निर्देशानुसार एक हजार लोकसंख्येमागे १ डॉक्टर अपेक्षित आहे. परंतु, राज्यातील डॉक्टरांची कमतरता लक्षात घेता राज्य शासनाने १७ जुलै २०२३ रोजी राज्यातील ठाणे, पालघर, जालना, बुलढाणा, वाशिम, भंडारा, गडचिरोली, अमरावती व वर्धा या नऊ जिल्ह्यांमध्ये १०० विद्यार्थी प्रवेश क्षमता असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला मंजुरी दिली होती. यानंतर लगेच १ ऑगस्ट २०२३ रोजी या वैद्यकीय महाविद्यालयाच्या पुढील कामकाजाला गती मिळण्यासाठी अधिष्ठाता यांची नियुक्तीदेखील केली होती. या नियुक्तीनंतर सर्वच जिल्ह्यांमध्ये वैद्यकीय महाविद्यालय कार्यान्वित करण्याच्या हालचाली सुरू झाल्या. एनएमसीच्या निर्देशानुसार सर्व परवानगी मिळविणे देखील सुरू झाले.
काही ठिकाणी काही प्रमाणात स्टाफही उपलब्ध झाला. परंतु वैद्यकीय महाविद्यालयासाठी आवश्यक असलेला प्राध्यापक वर्ग अजूनही मिळालेला नाही. त्याचबरोबर बायोमेट्रिक प्रणालीदेखील नसल्याचे निरीक्षण २४ जून २०२४ रोजी एनएमसीच्या चमूने नोंदविली आहेत. तसचे २८ जूनला झालेल्या व्हिडिओ कॉन्फरन्समध्येही तशा प्रकारच्या सूचना प्राप्त झाल्याची विश्वसनीय माहिती आहे. संबंधित वैद्यकीय महाविद्यालय हे याच शैक्षणिक वर्षात एनएमसीने नोंदविलेल्या त्रुटी पूर्ण करतील की नाही याविषयी शंका उपस्थित होत असून, पालघर वगळता इतर आठही जिल्ह्यांतील वैद्यकीय महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२४-२५ पासून सुरू होण्याच्या आशा धूसर झाल्या आहेत.