यशोमती ठाकूर : विधान भवनात आग्रही मागणीअमरावती : ग्रामीण भागातील शासकीय शाळांची दयनीय अवस्था झाली आहे. ग्रामीण भागात अनेक शाळा आजही झाडाखाली भरत आहेत. या दृष्टीने शासनाने तातडीने पावले उचलण्याची गरज आहे. ही परिस्थिती सुधारण्यासाठी शाळांची इन्फ्रास्ट्रक्चरकरिता भरीव निधी उपलब्ध करून देण्यात यावा, अशी आग्रही मागणी तिवसा मतदारसंघाच्या आमदार यशोमती ठाकूर यांनी मंगळवारी विधान भवनात केली. जालना जिल्ह्यातील प्रत्येक शाळेत बायोमॅट्रिक प्रणालीची अंमलबजावणी सुरू झालेली आहे. या प्रणालीची अंमलबजावणी संपूर्ण राज्यातही करण्यात यावी, अशी मागणी यशोमती ठाकूर यांनी यावेळी बोलताना केली. अमरावतीतील विजयमाला देशमुख ग्रामीण शिक्षकांचे प्रशिक्षण घेतात. त्यांच्यासोबत चर्चा करून शिक्षकांचे व अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण घेण्याची मागणीही यशोमती ठाकूर यांनी सभागृहात केली. बालकांच्या मोफत शिक्षणाचा कायद्याबाबत नेहमीच सदस्य बोलतात. परंतु ग्रामीण भागातील अनेक शाळांमध्ये शिक्षकांची पदे अद्यापही रिक्त आहेत. शिक्षकांची पदे मंजूर असूनही ती भरली जात नाही. वरिष्ठ स्तरावर त्याला मंजुरी मिळते. परंतु जिल्हास्तरावर मंजुरीकरिता संस्था व शिक्षकांना शिक्षणाधिकाऱ्यांना विनवणी करावी लागते. ती कशासाठी करावी लागते हे आपल्याला माहीत नसले तरी शिक्षणाधिकाऱ्यांची भेट न घेतल्यास सदर भरतीच रद्द केली जाते. याकडेही ठाकूर यांनी सभागृहाचे लक्ष वेधले. सर्व शिक्षा अभियानांतर्गत ग्रामीण भागातील शाळांवर मोठ्या प्रमाणावर ब्लॉक देण्यात येत होता. परंतु तो बंद करण्यात आला आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील शाळांची स्थिती दयनीय झाली आहे. ग्रामीण भागातील गोरगरीब मुलांना दर्जेदार शिक्षणासोबतच सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चरकरिता भरीव निधी देण्याची गरज असल्याचे यशोमती ठाकूर यांनी यावेळी सांगितले. (प्रतिनिधी)
शासकीय शाळांसाठी हवा भरीव निधी
By admin | Published: April 05, 2015 12:25 AM