चिखलदरा (अमरावती) : मागील आठवड्यापासून विदर्भाचे नंदनवन असलेल्या चिखलदरा पर्यटनस्थळासह संपूर्ण मेळघाट थंडीने गारठला आहे. या आठवड्यात सर्वात कमी 7 अंश सेल्सिअस, तर कमाल 15 अंश सेल्सिअसची नोंद झाली.
देशभरात सर्वत्र थंडीची लाट पसरली असतानाच मेळघाटातसुद्धा गारवा जाणवू लागला आहे. बोचरी थंडी दिवसभर शरीरात हुडहुडी भरवत असताना सायंकाळी चार वाजतापासूनच घराघरांत शेकोट्या पेटविल्या जात आहेत. चिखलदऱ्यात 19 डिसेंबर रोजी किमान तापमान ७ अंश सेल्सिअस व तर कमाल 15 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद येथील महाविद्यालयाच्या तापमान केंद्रावर नोंदविल्याचे पर्यावरण विभागाचे प्रमुख प्रा. विजय मंगळे यांनी सांगितले. तीन दिवसांपासून रात्रीचा पारा कमालीचा घसरत असून, तो किमान 9 अंश सेल्सिअसपेक्षा कमी आहे. शुक्रवार, 21 डिसेंबर रोजी किमान 8 अंश सेल्सिअस व कमाल 18 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
आदिवासी पाड्यांमध्ये शेकोट्या पेटल्या
घनदाट जंगलात असलेल्या मेळघाटच्या घाटवळणातील खेड्यांपाड्यात शेकोट्या व चुलीजवळ बसून आदिवासी थंडीपासून स्वसंरक्षण करीत आहेत. चिखलदऱ्याप्रमाणेच व्याघ्र प्रकल्पाच्या अतिसंरक्षित क्षेत्रातील सेमाडोहसहनजीकचा परिसर गारठल्याने नागरिक व पर्यटक शेकोट्या पेटवून आल्हाददायी वातावरणात पर्यटनाची मौज घेत आहेत.