परतवाडा : अचलपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गतवर्षी झालेल्या कर्मचारी भरतीतील गैरप्रकारातील आरोपी लता राकेश वाजपेयी हिचा अटकपूर्व जामीन अर्ज अचलपूर न्यायालयाने शुक्रवारी फेटाळला. दुसरीकडे आरोपी सहायक सचिवांसह शिपाई शुक्ला व लता वाजपेयी हे तिघे पसार आहेत.
२१ डिसेंबर रोजी याप्रकरणी परतवाडा पोलिसांनी गुन्हे नोंदविले. दोन दिवसांनंतर सदर प्रकरणाचा तपास पुन्हा प्रथम चौकशी करणाऱ्या अचलपूर पोलिसांकडे वळते करण्यात आला. त्यानुसार ठाणेदार देवानंद वानखडे व सहकारी कर्मचाºयांनी दोन संचालकांनंतर कार्यरत सहा कर्मचाऱ्यांचे बयाण नोंदविले. एकंदर सर्व संचालक व १८ कर्मचाऱ्यांचे बयाण नोंदविले जाणार आहे.
त्या दोघांची आशा मावळली
आरोपी लता राकेश वाजपेयी हिच्यावतीने वकिलांनी अचलपूर येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश क्रमांक २ एम. एच. पठाण यांच्या न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. त्यावर शुक्रवारी न्यायालयात युक्तिवाद झाला. पोलिसांच्यावतीने सहायक सरकारी अभियोक्ता गोविंद विचोरे यांनी युक्तिवाद केला. न्यायालयाने दोन्ही बाजू ऐकल्यानंतर आरोपी लता वाजपेयी हिचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला. आरोपी सहायक सचिव मंगेश भेटाळू, शैलेश शुक्ला यांच्या अटकपूर्व जामिनाची शक्यता मावळली आहे.