अमरावती : अल्पवयीन मुलीला तीन दिवसांपासून घेऊन फिरणाऱ्या एका महिलेविरुद्ध गाडगेनगर पोलिसांनी शनिवारी अपहरणासह पिटा ॲक्टनुसार गुन्हा नोंदविला. अल्पवयीन मुलगी ही इर्विन रुग्णालयात आढळून आली. सदर मुलीला महिलेने या ठिकाणी आणून सोडल्याची माहिती प्राथमिक तपासातून समोर आली आहे.
पोलिसांनी नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील रहिवासी असणाऱ्या एका ३१ वर्षीय आरोपी महिलेला अटक केली. तिची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. तिने मानवी तस्करी करून अल्पवयीन मुलीला वाईट मार्गाने लावण्याच्या अनुषंगाने पळवून नेल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. सदर मुलीला अज्ञात व्यक्तीने पळवून नेल्याची तक्रार तिच्या वडिलांनी पोलिसांत नोंदविली होती. त्यानंतर पोलिसांनी आपले सूत्रे फिरवली. महिलेचा अमरावती मध्यवर्ती आगार परिसरातसुद्धा वावर असतो, अशी माहिती गाडगेनगर पोलिसांनी मिळविली आहे. पुढील तपास गाडगेनगरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आसाराम चोरमले करीत आहेत. पोलिसांच्या पथकामध्ये पोलीस उपनिरीक्षक मयतकर, सचिन माकोडे यांचाही समावेश होता.