प्रदीप भाकरे, अमरावती: नागपुरी गेट ठाण्यात कार्यरत एका महिला पोलीस अधिकाऱ्यावर एका महिलेनेच हल्ला केला. बचावासाठी पुढे सरसावलेल्या त्यांच्या रायटर अंमलदाराच्या डोळ्याला नखाने ओरबाडले. २० जानेवारी रोजी रात्री एकच्या सुमारास ट्रान्सपोर्टनगर येथे तो प्रकार घडला. याप्रकरणी, जखमी महिला पोलीस अधिकाऱ्याच्या तक्रारीवरून नागपुरी गेट पोलिसांनी संबंधित आक्रमक महिलेविरूध्द सरकारी कामकाजात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.
२० जानेवारी रोजी रात्री नागपुरी गेट ठाण्यात कार्यरत महिला पोलीस अधिकारी रायटर व चालक अंमलदारांसह पेट्रोलिंग करत होत्या. त्यावेळी २० जानेवारी रोजी उशिरा रात्री एकच्या सुमारास त्यांना २५ ते ३० वर्षे वयोगटातील एक महिला ही तिच्या दुचाकीसह उभी दिसली. त्यामुळे पोलीस अधिकारी महिलेने तिला काही मदत हवी का, अशी विचारणा केली. त्यावर माझ्या गाडीत पेट्रोल नाही. तुम्ही मला काय मदत करणार, येथून निघून जा, असे उध्दटपणे उत्तर दिले. तरीदेखील महिला पोलीस अधिकाऱ्याने तिला स्वत:चा परिचय देत परत तिला मदतीबाबत विचारणा केली. तिला समजाविण्याचा प्रयत्न केला असता तिने महिला अधिकाऱ्यावर हल्ला केला. त्यांच्या रायटरला देखील ईजा पोहचविली. ती ऐकण्याच्या स्थितीत नव्हती.
नाव, पत्ताही सांगेना :
दोन महिला अंमलदार बोलावून तिला पोलीस ठाण्याच्या वाहनात बसण्यास सांगितले असता, तिने पुन्हा वाद करत नकार दिला. अखेर तिला रात्री १.५० च्या सुमारास पोलीस ठाण्यात आणण्यात आले. तेथे देखील तिने स्वत:चे नाव सांगण्यास नकार देऊन उडवाउडवीचे उत्तरे दिली. महिला अंमलदारांनी तिला विश्वासात घेऊन तिची ओळख पटविल्यानंतर रूग्णालयात तिची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. तिने सांगितलेल्या नाव पत्याबाबत शंका आल्याने तिला तिचे आधार कार्ड बाबत विचारणा केली असता तिने आधार कार्ड दिले. त्यावरून तिची खरी ओळख पटली. ती घटस्फोटित असल्याचे देखील समोर आले. तिच्या नातेवाईकांना बोलावून तिला त्यांच्याकडे सुपुर्द करण्यात आले.