परतवाडा : मुलीने प्रेम विवाह केल्याच्या कारणावरून मुलाच्या आईच्या हाताला चावा घेणाऱ्या आरोपीला हजार रुपये रोख नुकसान भरपाई म्हणून दंडाची शिक्षा व चांगल्या वागणुकीचे दहा हजार रुपयांच्या बाँडवर हमीपत्र लिहून देण्याचे आदेश अचलपूर न्यायालयाचे प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी क्रमांक २ जी.बी.औंधकर यांच्या न्यायालयाने दिला.
राजू रामकृष्ण कपले (४७, रा. हनवतपुरा अचलपूर) असे शिक्षा पात्र आरोपीचे नाव आहे. ७ फेब्रुवारी २०१८ रोजी उर्मिला मोतीराम मेहरे (४५, रा. हनवतपुरा) यांना आरोपी राजू कपले अंगावर सब्बल घेऊन मारण्यास धावला व हाताला चावा घेऊन जखमी केल्याच्या फिर्यादीवरून अचलपूर पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हे दाखल केले. घटनेचा तपास जमादार श्रावण काळपांडे यांनी करून दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले. प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी क्रमांक २ जी.बी औंधकर यांच्या न्यायालयाने साक्षी पुराव्यावरून दोषसिध्दी धरून १,००० रुपये फिर्यादीस नुकसान भरपाई. तसेच एक वर्ष चांगल्या वर्तणुकीचा १०,००० रुपयांच्या बाँडवर हमीपत्र देण्याचा आदेश दिला. सरकार पक्षातर्फे अभियोक्ता हरणे यांनी युक्तिवाद केला. ठाणेदार मनोज चौधरी यांच्या मार्गदर्शनात कोर्ट पैरवी म्हणून पो.ना. अनिल अखंडे यांनी कामकाज पाहिले.