अमरावती : माहेरची मंडळी घरी आणू नकोस, तूदेखील माहेरी जाऊ नकोस, अशी धमकी देत एका ३८ वर्षीय विवाहितेचा गळा आवळून खून करण्यात आला. शवविच्छेदनात ही बाब उघड झाल्यानंतर मृताच्या पतीसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तत्पूर्वी, तिने आत्महत्या केली, असा बनाव सासरच्या मंडळीने रचला होता. मात्र, तिची आत्महत्या नसून हत्या करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता.
फरीन बानो मो. शफिक (३८, रा. हबिबनगर क्र. २) असे मृत महिलेचे नाव आहे. २३ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास तिच्या मृत्यूची वार्ता तिच्या माहेरच्या मंडळीला देण्यात आली. त्यामुळे तिचे दोन्ही भाऊ हबीबनगरात पोहोचले. तेथे फरीनबानो ही पडलेल्या स्थितीत दिसली, तर तिच्या पतीसह सासू, सासऱ्यांनी तिने गळफास घेतल्याचे त्यांना सांगितले. गाडगेनगर पोलीसदेखील पोहोचले. त्यांनी तिला एका खासगी रुग्णालयात हलविले. मात्र, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. उशिरा रात्री तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी इर्विनमध्ये आणण्यात आला.
गुरुवारी दुपारी फरीनबानोच्या नातेवाइकांनी शवागारासमोर एकत्र येत तिचा खून झाल्याचा आरोप केला. त्यावेळी गाडगेनगर पोलिसांनी त्यांना शांत केले. दरम्यान, गुरुवारी रात्री प्राथमिक शवविच्छेदन अहवालात तिचा मृत्यू गळफास घेतल्याने नव्हे तर गळा आवळल्यामुळे झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर मृताचा नातेवाईक शेख नासिर शेख कदीर (३७, रा. हबीबनगर नं. १) याच्या तक्रारीवरून गाडगेनगर पोलिसांनी मृताचा पती मो. शफीक, शेख अनिस, मो. शहजाद व दोन महिला अशा पाच जणांविरुद्ध खून व पुरावा नष्ट करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. पैकी तिचा पती मो. शफिक व शेख अनिसला अटक करण्यात आली आहे.
..अशी आहे तक्रार
तुझ्या माहेरच्या मंडळीला सासरी आणू नकोस. त्यांना बोलावूदेखील नकोस. तूसुद्धा जाऊ नकोस, असे म्हणत तिचा अनन्वित छळ करण्यात आला. तिचा गळा आवळून खून करण्यात आला तथा तिने गळफास घेतला, असा बनाव करून पोलिसांची दिशाभूल केली, असे तक्रारीत म्हटले आहे. डीसीपी विक्रम साळी, सहायक पोलीस आयुक्त पूनम पाटील यांच्या नेतृत्वात ठाणेदार आसाराम चोरमले यांनी मृताच्या पतीसह दोघांना अटक केली.