मोर्शी : एका २६ वर्षीय विवाहितेने तिच्या एक वर्षाच्या मुलासह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची हृद्यद्रावक घटना तालुक्यातील गणेशपूर येथे सोमवारी दुपारी उघड झाली. दुपारी १ वाजताच्या सुमारास कंचना शेषराव लोखंडे (२६, रा. गणेशपूर) व तिचा चिमुकला नवीनकुमार याचा मृतदेह शिवारातील विहिरीत तरंगताना दिसल्याने गावात खळबळ उडाली.
मोर्शी शहरापासून २० किलोमीटर अंतरावर असलेल्या गणेशपूर येथे गावालगत जयदेव लोखंडे यांचे शेत आहे. ते मुलगा, सून व नातवांसह त्याच शेतातच घर बांधून राहतात. स्वत:ची शेती व मोलमजुरी करून लोखंडे कुटुंब गुजराण करतात. सोमवारी दुपारी जयदेव लोखंडे, मुलगा शेषराव व अन्य सदस्य शेतातील घरात असताना त्यांना कंचना ही मुलासह शेतातील विहिरीजवळ उभी दिसली. मात्र, घरातील सर्वच जण विहिरीजवळ नेहमीच जात असल्याने कुणालाही शंका आली नाही. दरम्यान तिने मुलासह विहिरीत उडी घेताच कुटूंबीय विहिरीकडे धावले. मात्र, ते दोघेही मायलेक विहिरीत नाहीसे झाले होते. आरडाओरड केल्यानंतर गावातील गणेश मरकाम याने विहिरीत उडी घेतली. मात्र, त्यांचा शोध लागू शकला नाही. तातडीने या घटनेची माहिती मोर्शी पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठत ग्रामस्थांच्या मदतीने मायलेकांचे मृतदेह विहिरीबाहेर काढले. पंचनाम्यानंतर उत्तरीय तपासणीसाठी मोर्शी उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. या घटनेने गावात हळहळ व्यक्त होत आहे.
मोठा मुलगा पाच वर्षांचा
कंचना हिचे पाच वर्षाआधी शेषराव लोखंडे यांचेसोबत लग्न झाले. त्यांना पाच वर्षे व एक वर्षे वयाची दोन मुले होती. पैकी एक वर्षाच्या मुलाला घेऊन कंचना हिने आत्मघात केला. वृत्त लिहिस्तोवर आत्महत्येचे कारण कळू शकले नाही. यापुर्वीही कंचना हिने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे सांगण्यात आले. मात्र, पोलिसांकडून त्या माहितीस दुजोरा मिळू शकला नाही.
कोट
गणेशपूर शिवारातील एका विहिरीतून महिला व तिच्या मुलाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. मृत्युचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होईल. त्यावरच गुन्ह्याचे स्वरुप अवलंबून असेल.
- संजय सोळंके, ठाणेदार, मोर्शी
--------------