अमरावती : मुलाऐवजी मुलगी झाल्याने सासरच्या मंडळींनी अनन्वित छळ केला. तो त्रास असह्य झाल्याने एका विवाहितेने गळफास घेऊन आत्मघात करवून घेतला. २१ मार्च रोजी ती घटना घडली. याप्रकरणी ८ एप्रिल रोजी नागपुरी गेट पोलिसांनी मृताचा पती, सासरा व तीन महिलांविरुद्ध गुन्हा दाखल केला.
तक्रारीनुसार, येथील सैयद कयूम सै. बशीर यांच्या मुलीचे १७ फेब्रुवारी २०१९ रोजी आरोपी अब्दुल नौशाद याच्याशी मुस्लिम रीतीरिवाजाने लग्न झाले. लग्नानंतर जानेवारी २०२० मध्ये तिला मुलगी झाली. मात्र, त्यानंतर पतीसह सासरा व अन्य तीन महिलांनी तिला मुलगा का झाला नाही, अशी विचारणा करून तिचे जगणे दुरापास्त केले. तिचा अनन्वित छळ केला. तिचा शारीरिक व मानसिक छळ केला.
अन्य एक महिलादेखील अब्दुल नौशादला तिच्याविरुद्ध भडकवत होती. त्या त्रासाला कंटाळून तिने २१ मार्च २०२२ रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी नागपुरी गेट पोलिसांनी त्यावेळी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. मात्र, पती, सासरा व तीन महिलांच्या छळाला कंटाळून आपल्या मुलीने आत्महत्या केली, अशी तक्रार मृताच्या पित्याने नोंदविली. त्या तक्रारीवरून नागपुरी गेट पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गुन्हा नोंदविला. ठाणेदार पुंडलिक मेश्राम यांच्या नेतृत्वात पुढील तपास सुरू आहे.