अमरावती : मुलगा होत नसल्याने तिला मुलगा पाहिजे म्हणून महिलेने एका दीड महिन्याच्या बाळाच्या अपहरणाची योजना आखली. त्यात ती यशस्वीसुद्धा झाली. मात्र, पोलिसांनी वेळीच दखल घेतल्याने महिलेचे पितळ उघडे पडले. तिला मुलगा हवा होता म्हणून तिने बाळाचे अपहरण केल्याची माहिती पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आली.
त्यानंतर महिलेला अटक शनिवारी न्यायालयासमोर हजर केले असता तिची रवानगी कारागृहात करण्यात आली आहे. दीड महिन्याच्या बाळाला तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखित डफरिन रुग्णालयात ठेवले असल्याची माहिती आहे.
प्राप्त महितीनुसार, नांदगावपेठ ठाणे हद्दीतील पिंपविहीव पारधी बेडा येथे राहणाऱ्या सरनेश सरमात भोसले यांच्या दीड महिन्याच्या बाळाचे अपहरण एका आरोपी महिलेने केले होेते. त्यानंतर नांदगावपेठ पोलिसांनी महिलेचा शोध घेतला.
तिची प्रकृती चांगली नसल्याने तिला डफरिन रुग्णालयात दाखल करण्यात आले. शनिवारी तिला डिस्चार्ज मिळाल्यानंतर न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने तिची रवानगी कारागृहात केली.
बॉक्स :
दोन वेळा झाला महिलेचा गर्भपात
आरोपी महिला प्रिया गोंडाणे हिला एक मुलगी असून तिला मुलगा हवा होता. मात्र, दोन वर्षांत तिचा दोनदा गर्भपात झाला. त्यामुळे तिचे मुलगा होण्याचे स्वप्न अधुरे राहिले. तिला मुलगा तर मुलीला भाऊ मिळण्याच्या उद्देशाने तिने सरनेस भोसले व पत्नीला विश्वासात घेतले. तसेच शासनाच्या वतीने मिळणाऱ्या १० हजारांचे आमिष दाखविण्यात आले. त्यानंतर बाळाच्या आई- वडिलांना नांदगावपेठ येथे बोलावून बँक पासबुकच्या झेरॉक्स काढण्याच्या बाहाण्याने झेरॉक्स काढण्याकरिता पाठवून बाळाचे अपहरण करण्यात आले होते, असे पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत निष्पन्न झाले आहे.