अंजनगाव सुर्जी (अमरावती) : सातेगाव येथे 13 दिवसांपूर्वी अनसुया शिवलाल महाजन या महिलेची हत्या करण्यात आली होती. या हत्येप्रकरणी मंगेश गजाननं इंगळे (वय 19 वर्ष) या तरुणास अटक करण्यात आली आहे. शेतातील धु-याचा व लघुशंका करण्याच्या वादातून त्याने अनसुया यांची हत्या केल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी रहिमापूर पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेने संशयितांची कसून चौकशी केली होती. याप्रकरणी पोलिसांनी ३०२ व २०१ अन्वये गुन्हे दाखल केले आहेत. रहिमापूर पोलीस ठाण्यांतर्गत सातेगाव शेत शिवारात कापूस वेचायला गेलेल्या अनसुया शिवलाल महाजन यांचा मृतदेह 1 नोव्हेंबरला दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास जवळच्या शेतातील विहिरीत आढळला होता. गळा आवळून तिची हत्या करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. याप्रकरणी अनेकांवर संशय असल्याने पोलिसांनी कसून चौकशी सुरू केली होती. दुसरीकडे अनेक दिवस होऊनही आरोपीचा शोध लागत नसल्याने रहिमापूर पोलिसांवर दबाव वाढला होता.
मिळालेल्या माहितीनुसार, अनसुया महाजन हिच्या हत्येमागे शेतातील धु-याचा व लघुशंकेचा वाद कारणीभूत आहे. काही दिवसांपूर्वी मृत महिलेचा पती शिवलाल महाजन व आरोपीचे वडील गजानन इंगळे यांच्यात धु-याचा वाद नेहमीचाच झाला होता. आरोपी मंगेश व मृत अनसुया हिच्यासोबतही यावरून भांडण झाले होते. तसंच अनसुया महाजन शेतकाम करीत असताना त्यांच्या पाण्याच्या डबकीत लघुशंका करत असल्याचा आरोप महाजन यांच्याकडून करण्यात आला होता, यावरूनही वाद होत असत. 1 नोव्हेंबरला सकाळी 11 ते दुपारी 2 वाजण्याच्या दरम्यान गुरे चरत असताना त्याच्यासोबत असलेल्या दोघांना शेतातील स्प्रिंकलरची शिप बदलून येतो, असे सांगितले व निघून गेला. शेतात जात असताना अनसुया एकटीच कापूस वेचताना दिसल्याने तिच्या जवळ जाऊन मी लघुशंका केली नाही असे म्हणत त्यानं वाद घातला. वादाचे रुपांतर भांडणात झाले. या झटापटीत तिच्या गळ्यात असलेली कापसाची खंदाळीचा फास लागला व ती मृत्यू झाला. त्यानंतर भीतीपोटी अनसुया महाजन यांचा मृतदेह बाजूच्या शेतातील कोरड्या विहिरीत फेकला व पळ काढला.
या प्रकरणाचा तपास अंजनगाव सुर्जीचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील जायभाये, रहिमापूरचे ठाणेदार सचिन शिरसाट, सहायक उपनिरीक्षक गजानन रहाटे, सचिन भोसले, रमेश गोरले, सुधाकर चव्हाण, चंद्रकांत खंदार, प्रफुल रायबोले, विलास पटोकार, निलेश तोटे यांनी केला. आरोपीला व्हायचे होते पोलीसआरोपी मंगेश हा मागील काही दिवसापासून पोलीस भरती तसेच शासकीय स्पर्धा परीक्षांची तयारी करीत होता. आरोपीचे वडील रहिमापूर ठाण्यात होमर्गाड असल्यामुळे पोलीस होण्याकडे त्याचा जादा कल होता.
या गुह्यात आरोपीजवळ डिजिटल यंत्र नसल्याने किंवा मोबाइल वापरला नसल्यामुळे आरोपी शोधणे कठीण झाले होते. पोलिसांनी त्या दिवशीचे सॅटेलाईट इमेजचा वापर केला. महाजन यांच्या शेताच्या आजूबाजूच्या शेतात होणा-या घडामोडींची पाहणी केली आहे. या माहितीवरून आरोपीस अटक केली. विचारपूस केल्यावर तो फुटला. - सुनील जायभाय, उपविभागीय पोलीस अधिकारी, अंजनगाव