अमरावती : अरे देवा! हेच तर आहेत ते भामटे, यांनीच चाकूच्या धाकावर माझ्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकाविण्याचा प्रयत्न केला, अशा शब्दांत एका महिलेने चेनस्नॅचर्सच्या दुकलीला ओळखले. आरडाओरड केली, त्यामुळे एक महिला धावत आली, त्यामुळे माझे मंगळसूत्र वाचले, अशी आपबीती पराग टाउनशिपमधील त्या महिलेने गाडगेनगर पोलिसांकडे कथन केली.
गाडगेनगर पोलिसांनी कालपरवा जगजीतसिंग टांक (२९, पॉवर हाउस झोपडपट्टी) व विकेश खंडारे (३४, रा. शासकीय वसाहत, नांदगाव पेठ) या दोन चेनस्नॅचर्सला अटक केली. त्यांच्याकडून चोरीचे सोने घेणारेदेखील गजाआड झाले. कधी चाकूचा धाक दाखवून, तर कधी पाठलाग करून केलेल्या ११ चेनस्नॅचिंगची कबुलीदेखील त्यांनी दिली. त्या घटनांमधील फिर्यादीकडून आरोपींची ओळख पटविण्यात आली.
चेनस्नॅचर्स पकडले गेल्याने, भीती दूर झाल्याने केवळ भीतीपोटी तक्रार दाखल न करणारेदेखील पोलीस ठाण्यात पोहोचू लागले आहेत. अशीच एक महिला २३ डिसेंबर रोजी गाडगेनगर ठाण्यात पोहोचली. तिला टांक व खंडारे दाखवताच ती उद्गारली. अरे देवा! हेच तर आहेत ते भामटे! ४ डिसेंबर रोजी चाकूचा धाक दाखवून मंगळसूत्र हिसकावण्याचा प्रयत्न करणारे हेच ते दोघे, असे स्पष्ट झाल्यावर गाडगेनगर पोलिसांनी टांक व खंडारेविरुद्ध २३ डिसेंबर रोजी विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला.
...अशी झाली होती घटना
४ डिसेंबर रोजी सायंकाळी ५.३० वाजता फिर्यादी महिला आपल्या मुलाला शिकवणीहून परत घेऊन जात असताना तेलाई मंगल कार्यालयाच्या मागे असलेल्या पराग टाउनशिपजवळ दोन इसम पाठीमागून आले. एक दुचाकीवर बसून होता, तर दुसरा इसम अचानक महिलेच्या जवळ आला. त्याने चाकू दाखवून तिच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकण्याचा प्रयत्न केला. तिने आरडाओरड केल्याने एक महिला धावत आली. त्यामुळे ते दोघेही दुचाकीने पळून गेले. ती घाबरली व माहेरी निघून गेली. गुरुवारी ती पतीसह गाडगेनगर ठाण्यात आली.
सीपी मॅडमला धन्यवाद सांगा
पोलिसांनी ते चेनस्नॅचर्स पकडल्याने आपल्या मनातील भीती दूर झाली. आपण तक्रार देण्यासाठी आलो. आरोपींना पकडल्यामुळे अनेक महिलांच्या मनातील अशा घटनांबाबतची दहशतदेखील दूर झाली. त्यामुळे सीपी मॅडमला धन्यवाद सांगा, असेदेखील ती सद्गदित भावनेेने म्हणाली.