डहाकेंची जागा रिक्त : आमसभेत होणार घोषणाअमरावती : शिवसेनेचे नगरसेवक दिगंबर डहाके यांच्या अकाली निधनाने स्थायी समितीतील त्यांचे पद रिक्त झाले आहे. डहाकेंच्या रिक्त पदी शिवसेनेकडून सदस्य द्यावा, असे पत्र नगरसचिवांकडून पक्षनेत्याला पाठविण्यात आले आहे. याबाबत शिवसेनेचे गटनेते तथा विरोधी पक्षनेते प्रवीण हरमकर यांनी दुजोरा दिला असून स्थायी समितीत शिवसेनेकडून महिला नगरसेवकाची वर्णी लागण्याची शक्यता आहे.१६ सदस्यीय स्थायी समितीत शिवसेनेचे २ नगरसेवक सदस्य म्हणून पाठविण्यात आले. संख्याबळाच्या आधारावर सेनेचे दोन सदस्य असताना डहाकेंच्या आकस्मिक निधनाने स्थायीतील त्यांचे सदस्यत्व रिक्त झाले. त्यामुळे स्थायी समितीत आपलीच वर्णी लागावी, यासाठी इच्छुकांनी पक्षनेत्यांकडे रदबदली चालवली आहे. गटनेते प्रवीण हरमकर यांच्यानुसार अंतिम निर्णय खा. आनंदराव अडसूळ घेणार असल्याने ते कुणाच्या पारड्यात वजन टाकतात. त्यावर स्थायीतील शिवसेनेचा नवा चेहरा ठरणार आहे. प्रभाग क्रमांक २ तपोवनच्या नगरसेविका स्वाती निस्ताने आणि प्रभाग क्रमांक ३२ नवाथे प्लॉटच्या नगरसेविका वनिता तायडे या शिवसेनेच्या दोन नगरसेविकांमध्ये स्थायी समितीत जाण्यासाठी चुरस रंगण्याची शक्यता आहे. स्वाती निस्ताने या जिल्हा प्रमुख संजय बंड यांच्या गटाच्या समर्थक मानल्या जातात. तर तायडे या दिगंबर डहाकेंच्या सहकार्याने नवाथे प्लॉट प्रभागातून निवडून आल्या आहेत. त्यामुळे गटनेते तथा विरोधी पक्षनेते प्रवीण हरमकर यांच्यापुढे एक नाव ठरविण्याचे दिव्य उभे ठाकले आहे. वनिता हरणे या शिवसेनेचे दुसरे जिल्हा प्रमुख प्रशांत वानखडे यांच्या समर्थक असल्याचे बोलले जाते. (प्रतिनिधी)
स्थायी समितीत महिलेची वर्णी ?
By admin | Published: June 12, 2016 12:05 AM