बडनेरा (अमरावती) : दोन चिमुकल्यांसह महिलेने रेल्वेतून उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. ही घटना रविवारी मध्यरात्री कुरूम ते माना रेल्वे लाईनदरम्यान घडली. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या महिलेसह दोन्ही चिमुकल्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती केले होते. मात्र उपचारास प्रतिसाद न मिळाल्याने नागपूर येथे हलविण्यात आले आहे.आम्रपाली सुनील बनसोड (३०), प्रियंका सुनील बनसोड (२) व प्रथमेश सुनील बनसोड (३, सर्व रा. संजय गांधीनगर, अमरावती) अशी गंभीर जखमींची नावे आहेत. बडनेराहून अकोलाकडे जाणा-या मालगाडी चालकाला कुरूम ते मानादरम्यान महिला व दोन चिमुकले जखमी अवस्थेत रेल्वे लाईननजीक पडून असलेले आढळले. त्यांनी ही माहिती वाकीटॉकीद्वारे माना येथील रेल्वे स्टेशन मास्तरला दिली. त्याआधारे बडनेरा रेल्वे पोलिसांनी घटनास्थळ गाठून तीनही जखमींना तत्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात आणले. तिघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना नागपूर येथे हलविण्यात आले आहे.
बडनेरा पोलिसांची धावपळघटनेच्या माहितीवरून बडनेरा रेल्वे पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक पी.व्ही.चक्रे, पोलीस कर्मचारी प्रकाश सावळे, राजकुमार तेलमोरे, कादर खान यांनी घटनास्थळ गाठून रक्तबंबाळ अवस्थेतील जखमींना उपचारासाठी तत्काळ रुग्णालयात हलविले. मध्यरात्रीची घटना असल्यामुळे पोलिसांची चांगलीच धावपळ झाली होती.
महिलेविरुद्ध गुन्हा ही घटना बडनेरा हद्दीतील नसल्यामुळे बडनेरा पोलिसांनी झिरोडायरी कायम करून पुढील तपासासाठी हे प्रकरण अकोला रेल्वे पोलिसांकडे सोपविले. या प्रकरणी अकोला रेल्वे पोलिसांनी आत्महत्येचा प्रयत्न करणा-या महिलेविरूद्ध भादंविच्या कलम ३०७ व ३०९ अन्वये गुन्हा नोंदविला आहे. जखमी महिला ही दोन ते तीन दिवसांपासून ही महिला या गावाहून त्या गावी फिरत असल्याचे पोलीस चौकशीत निष्पन्न झाले आहे.