पोहरा बंदी : वडाळी वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या भातकुली वर्तुळातील लोणटेक बीटनजीकच्या छांगाणीनगर परिसरात पिसाळलेल्या नर माकडाने घराबाहेर रांगोळी काढत असलेल्या एका महिलेवर अचानक हल्ला करून किरकोळ जखमी केले. त्या महिलेला उपचाराकरिता सारडा हॉस्पिटल येथे हलविण्यात आले. या घटनेची माहिती वडाळी वनविभागाला मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी कैलास भुंबर यांच्या मार्गदर्शनाखाली भातकुली वर्तुळ अधिकारी पी.टी. वानखडे, लोणटेक बीटचे वनरक्षक नवेद काझी, वनरक्षक प्रशांत खाडे, विद्या बन्सोड, वनमजूर निरंजन राठोड यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळ गाठले. जखमी महिला भाग्यश्री नळे (रा. छांगाणीनगर) यांच्या कुटुंबीयांशी संवाद साधून घटनेचा पंचनामा करण्यात आला.
वडाळी वनविभागाने या माकडाचा तातडीने शोध घेण्यासाठी भातकुली वर्तुळातील वनपाल, वनरक्षक, वनमजुरांचे पथक तैनात केले. या पथकातील वनमजूर निरंजन राठोड यांच्या अंगावर माकडाने झाडावरून थेट झेप घेतली. वनमजुराला जमिनीवर कोसळताच वनरक्षक नवेद काझी मदतीला धावून गेले. पुन्हा माकडाने हल्ला करण्याचा प्रयत्न करताच नवेद काझी यांनी आरडाओरड केली. माकडाने झाडावर धूम ठोकली. या हल्ल्यात वनमजुरांचा डावा हात किरकोळ जखमी झाल्याने त्यांना उपचारार्थ पुंडकर हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले. अद्यापही माकडाचा शोध घेण्यासाठी भातकुली वर्तुळातील वनपाल, वनरक्षक, वनमजूर हे जिकरीचे प्रयत्न करीत आहेत.