अमरावती : अंगणवाडी पर्यवेक्षक पदासाठी आयोजित परीक्षा देण्यासाठी गुरुवारी शहरातील तक्षशीला पॉलिटेक्निक परीक्षा केंद्रावर पोहोचलेल्या परीक्षार्थी महिलाकडे विवाह प्रमाणपत्र (मॅरेज सर्टिफिकेट) नसल्याने त्यांना परीक्षा केंद्रावर प्रवेश नाकारण्यात आला. जवळपास ५० ते ६० परीक्षार्थींना प्रवेश नाकारल्याने काही वेळाकरिता या परीक्षा केंद्रावर चांगलाच गोंधळ उडाला होता. परीक्षेचे आयोजन करणाऱ्या आयबीपीएसने परीक्षार्थींना विवाह प्रमाणपत्राच्या अनुषंगाने कोणतीही पूर्व सूचना दिलेली नसताना वेळेवर विवाह प्रमाणपत्र कुठून आणायचे असा प्रश्न उपस्थित करत परीक्षार्थींनी न्यायासाठी जिल्हाधिकारी कार्यालय गाठून तत्काळ परीक्षा रद्द करण्याची मागणी केली.
राज्यभरात जिल्हा परिषदेअंतर्गत अंगणवाडी पर्यवेक्षक पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात आली. या पदासाठी आयबीपीएस अंतर्गत अर्ज मागविण्यात आले होते. अर्ज केलेल्या परीक्षार्थींची ऑनलाइन परीक्षेचे आयोजन गुरुवारी करण्यात आले होते. शहरातही तक्षशीला पॉलिटेक्निक येथे या परीक्षेचे आयोजन केले होते. त्यामुळे याठिकाणी, उस्मानाबाद, लातूर, हिंगोली, बुलढाणा तसेच विविध जिल्ह्यांतील परीक्षार्थी महिला परीक्षा देण्यासाठी आल्या होत्या. परंतु ज्या महिलेच्या प्रवेशपत्र आणि ओळखपत्र यावरील आडनावामध्ये तफावत होती, अशा महिलांकडून परीक्षा केंद्रावर प्रवेश देण्यासाठी त्यांच्या विवाह प्रमाणपत्र (मॅरेज सर्टिफिकेट) ची मागणी परीक्षा केंद्रावरील संबंधित अधिकाऱ्यांकडून करण्यात आली.
ज्यांच्याकडे प्रमाणपत्र नाही अशांना प्रवेश नाकारण्यात आला. त्यामुळे परीक्षा केंद्रावर एकच गोंधळ उडाला. त्यामुळे याठिकाणी पोलिसांनाही बोलावण्यात आले होते. परीक्षार्थी महिलांच्या म्हणण्यानुसार आयबीपीएसकडून अर्ज स्वीकारताना कोणत्याही प्रकारे विवाह प्रमाणपत्र मागितले नाही. ज्या ओळखपत्रावर अर्ज केला तेच ओळखपत्र सोबत आणलेले असतानाही प्रवेश नाकारण्यात आला. त्यामुळे सदर परीक्षा रद्द करून पुन्हा नव्याने परीक्षा घ्यावी यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय येथे निवेदन देण्यात आले.