अमरावती : राज्याच्या वनविभागात महिला अधिकारी असुरक्षित आहे. त्यामुळे हरिसाल येथील वनपरिक्षेत्राधिकारी दीपाली चव्हाण यांना गोळी झाडून आत्महत्या करावी लागली. परिणामी दीपाली यांच्या मृत्यूला कारणीभूत असलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी महाराष्ट्र वनपरिक्षेत्राधिकारी संघटनेच्यावतीने शुक्रवारी प्रधान मुख्य वनसंरक्षक पी. साईप्रसाद यांच्याकडे निवेदनातून करण्यात आली आहे.
आरएफओ दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्या प्रकरणानंतर संपूर्ण वनविभाग ढवळून निघाला आहे. वनपरिक्षेत्राधिकारी संघटनांनी दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईसाठी आक्रमक भूमिका घेतली. त्यानंतर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल) पी. साईप्रसाद, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) नितीन काकोडकर यांच्या पुढ्यात जिल्ह्यातील आरएफओंनी मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक एम.एस. रेड्डी, गुगामलचे उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार यांच्या कारनामे मांडले. आरएफओ चव्हाण यांना वेगवेगळ्या प्रकारे त्रास दिला गेला, ही बाब आरएफओ संघटनेचे अध्यक्ष कांतेश्वर बाेबडे, सरचिटणीस नीलेश गांवडे, गणेश टेकाडे, कैलास भुंबर आदींनी मांडली. उपवनसंरक्षकांना आरएफओंच्या निलंबनाचे अधिकार असल्याने ते दुरुपयोग करतात, अशी कैफियत आरएफओंनी मांडली. यावेळी मृत दीपाली चव्हाण यांचे मामा व मामी यांनीसुद्धा दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली.
--------------------
दोषीवर कारवाईसाठी भाजपचे आंदोलन
वनपरिक्षेत्राधिकारी दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येला जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी, यासाठी भाजपच्यावतीने शुक्रवार जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या शवागारासमोर आंदोलन करण्यात आले. दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई झाल्याशिवाय शवविच्छेदन करू देणार नाही, अशी भूमिका भाजपने घेतली. यावेळी महापौर चेतन गावंडे, भाजपचे जिल्हाध्यक्ष निवेदिता चौधरी, शिवराय कुळकर्णी, बादल कुळकर्णी आदी उपस्थित होते.