अमरावती : एका महिलेने कर्तव्यावर असलेल्या महिला पोलीस शिपायला धक्काबुक्की करून शासकीय कामात अडथळा आणल्याची धक्कादायक घटना दस्तुरनगर चौकात शनिवारी दुपारच्या सुमारास घडली.
याप्रकरणी एका महिलेसह तिघांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा नोंदविला. ३७ वर्षीय महिला, राज पंडित सपकाळे (२१), यश पंडित सपकाळे (१९, रा. मंगलधाम कॉलनी) अशी आरोपींची नावे आहेत. त्यांच्याविरुद्ध भादंविचे कलम ३५३, २९४, ३४ अन्वये गुन्हा नोंदविला. राजापेठ ठाण्यात कार्यरत महिला पोलीस कर्मचारी स्टाफसह दस्तुरनगर फिक्स पॉइंटवर असताना महिला व एका इसमाशी वाद सुरू होता. फिर्यादी महिला पोलीस भांडण सोडविण्याकरिता गेल्या असता, भांडणातील इसम दुचाकीने निघून गेला. फिर्यादीने महिलेला शांत राहण्याबाबत म्हटले असता, ती महिला पोलीस महिलेच्या अंगावर आली व कॉलर पकडून धक्काबुक्की केली. राजापेठ पोलिसांना पाचारण करण्यात आले. पुढील तपास पोलीस करीत आहेत.