जेवणासाठी थेट अध्यक्षांकडे तक्रार : ढिसाळ नियोजनामुळे नाराजीलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : राज्य महिला आयोग आणि विभागीय आयुक्त कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी पार पडलेल्या महिला तक्रार निवारण समितीच्या कार्यशाळेत महिलांचीच गैरसोय झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. महिलांना जेवणासाठी थेट आयोगाच्या अध्यक्षांकडे तक्रार करावी लागली. ढिसाळ नियोजनामुळे उपस्थित महिलांनी नाराजी व्यक्त केली.येथील संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात विभागस्तरीय महिला तक्रार निवारण समितीची कार्यशाळा घेण्यात आली. यात महिलांवरील कौटुंबिक हिंसाचार, सार्वजनिक ठिकाणी होणारे अत्याचार याविषयावर कार्यशाळा पार पडली. कार्यशाळेला मोठ्या संख्येने महिलांसह पुरुषांची गर्दी उसळली होती. मात्र नियोजनात अनेक उणिवा असल्याने तक्रार सोडविण्यासाठी आलेल्या महिलांनाच अनेक गैरसोर्इंचा सामना करावा लागला. दुपारचे जेवण सुरू असताना अचानक आलेल्या पावसाने तारांबळ उडाली. आयोजकांकडून पर्यायी व्यवस्था करण्यात आली नसल्याने महिलांना जेवणासाठी अक्षरश: रेटारेटी करावी लागली. अचानक उसळलेल्या गर्दीमुळे महिलांच्या पायाखाली जेवणाच्या थाली तुडविण्यात आल्याचे चित्र अनुभवता आले. सकाळपासून कार्यशाळेत हजर असलेल्या विभागातील महिलांना पाणी, जेवण मिळविण्यासाठी कसरत करावी लागली. दरम्यान बुलडाणा, वाशिम जिल्ह्यातील महिलांनी जेवण मिळत नसल्याची गाऱ्हाणी थेट महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांच्याकडे केली. जेवणासाठी उसळलेल्या गर्दीमुळे महिलांनी केलेल्या तक्रारीची दखल घेण्याचे सौजन्य राज्य महिला आयोग अथवा विभागीय आयुक्त कार्यालयातील आयोजकांनी दाखविले नाही. त्यामुळे राज्य महिला आयोग खरेचं महिलांचे प्रश्न, समस्या सोडविण्यास किती सक्षम आहे, हे स्पष्ट होते.
आयोगाच्या कार्यशाळेत महिलांचीच गैरसोय
By admin | Published: June 24, 2017 12:07 AM