बडनेरा : येथील नवीवस्तीच्या इंदिरानगर, आदिवासीनगर, सिंधी कॅम्प भागात अनियमित होणाऱ्या पाणीपुरवठ्याविरुद्ध शनिवारी महिला व नागरिकांनी मजीप्रावर मोर्चा काढला. जुनी वस्ती जलकुंभ परिसरात तीन तास ठिय्या देत नियमित पाणीपुरवठा करण्याची मागणी त्यांनी केली. यावेळी पोलिसांचा मोठा ताफा तैनात होता.
मजीप्राचे कनिष्ठ अभियंता आजने यांना वारंवार मौखिक तक्रार देऊनही नागरिकांना नियमित पाणीपुरवठा केला जात नाही, अशी कैफियत महिलांनी मांडली. पाणीपुरवठ्याचे निश्चित वेळापत्रक नाही. कधी रात्री ११ वाजता तर, कधी रात्री १ वाजता पाणीपुरवठा केला जातो, असे रेखा रामटेके, पंचफुला बागडे, तारा गणवीर यांनी आक्षेप घेतला. इंदिरानगर, आदिवासीनगर, सिंधी कॅम्पचा परिसर वगळता अन्य ठिकाणी पाणीपुरवठा कसा केला जातो, असा सवाल उपस्थित करण्यात आला. पाणीपुरवठ्याची वेळ निश्चित करावी, त्याच वेळेवर पाणीपुरवठा करावा, अन्यथा कनिष्ठ अभियंता व इतर मजीप्राच्या कर्मचाऱ्यांना जलकुंभात डांबून ठेवण्याचा निर्वाणीचा इशारा आंदोलक महिलांनी दिला. यावेळी रमा वानखडे, ललिता बनसोड, गीता केवलानी, उषा वैद्य, शारदा रोकडे, पुष्पा गजभिये, मीरा गजरे, सुनीता सोनेकर, अमोल इंगोले, प्रतीक रणदिवे, उमेश बडगे, नितीन वैद्य, रोहित गजरे, सयमत रामटेके आदी उपस्थित होते.
-------------------
कोट
व्हॉल्व्ह नादुरुस्त असल्याने पाणीपुरवठा करताना अडथळा निर्माण होत आहे. मात्र, आता व्हॉल्व्ह दुरुस्त झाले असून, नागरिकांना निर्धारित वेळेनुसार पाणीपुरवठा केला जाईल.
- मोरेश्वर आजने, कनिष्ठ अभियंता. मजीप्रा, बडनेरा