पोलीस वर्तुळात खळबळ : चपराक हाणणाऱ्या महिलेविरूद्ध गुन्हा अमरावती : शिवजयंती रॅलीच्या बंदोबस्तादरम्यान एका दुचाकीस्वार महिलेने महिला पोलीस उपनिरीक्षकाच्या श्रीमुखात लगावल्याने पोलीस वर्तुळात खळबळ उडाली होती. शनिवारी रात्री शहर कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जयस्तंभ ते जवाहर मार्गावरील वंदना साडी सेंटरसमोर ही घटना घडली. शहर कोतवाली ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक सुनीता विश्वनाथ काळे (३५) शनिवारी रॅलीच्या बंदोबस्तासाठी जयस्तंभ चौकात तैनात होत्या. त्यांच्यासोबत वाहतूक पोलीस व ठाण्यातील काही पोलीस कर्मचारी सुध्दा होते. शोभायात्रेचे स्वरुप मोठे असल्यामुळे वाहतूक नियंत्रणाची जबाबदारी पोलीस अधिकारी व कर्मचारी सांभाळत होते. दरम्यान, जयस्तंभ चौक ते जवाहर मार्गावर रॅली असताना वाहतूक नियंत्रणासाठी या मार्गाची एक बाजू बंद करण्यात आली होती. मात्र, मोपेडवाहनधारक महिला जयश्री रितेश सेवक (२९, जुना सराफा बाजार) यांनी त्यांची गाडी या मार्गावरून पुढे नेली. त्यामुळे त्यांना एका पोलीस शिपायाने थांबविले. मात्र, त्यांनी पोलीस शिपायाला न जुमानता दुचाकी पुढे दामटण्याचा प्रयत्न केला. दरम्यान पोलीस उपनिरीक्षक सुनिता काळे यांनी जयश्री यांना थांबविण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्या पायाला जयश्रीच्या दुचाकीचा धक्का लागला. या कारणावरून सुनीता काळे व जयश्री यांच्यात शाब्दिक वाद झाला. यावेळी जयश्री यांनी सुनीता यांच्या श्रीमुखात लगावली. या प्रकारामुळे आणखी गोंधळात भर पडली. पोलिसांनी जयश्री सेवक हिला ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात नेण्यात आले. याप्रकरणी पीएसआय सुनिता काळे यांच्या तक्रारीवरून जयश्री सेवकविरुध्द भादंविच्या कलम ३५३, ३३२, १८६, ५०४, ३४ सहकलम ११०, ११२, ११७ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील चौकशी सहायक पोलीस निरीक्षक जयराम तावडे करीत आहेत. शहरात शिवजयंतीच्या शोभायात्रेचा जल्लोष सुरू असताना घडलेल्या या घटनेमुळे परिसरासह पोलीस वर्तुळात खळबळ उडाली होती. (प्रतिनिधी)
महिला पोलीस अधिकाऱ्याशी मुजोरी
By admin | Published: March 28, 2016 12:03 AM