धारणी (अमरावती) : मेळघाटच्या धारणी तालुक्यातील भोंडीलावा येथील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान केंद्रावर गेलेल्या मतदारांना आश्चर्याचा धक्काच बसला. येथे केंद्राध्यक्ष ते मतदान अधिकारी म्हणून महिला कर्मचा-यांनीच जबाबदारी पार पाडली. ही चर्चा गावात धडकताच मतदानाची गतीही वाढली. निवडणूक म्हणजे जोखमीचे काम. यामुळेच शासकीय सेवेतील पुरुष कर्मचा-यांचीच निवड बहुतेक वेळा मतदान केंद्रावर केली जाते. मात्र, महिला कर्मचा-यांची पोलिंग पार्टी हा राज्यातील पहिला प्रयोग मेळघाटात यशस्वी ठरला. भोंडीलावा येथे मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी म्हणून महिला अधिका-यांनी कर्तव्य बजाविले. महिलांना संधी दिल्यास त्या पुरुषांएवढ्याच जबाबदारीने कामगिरी पार पाडतात, हे दाखवून देण्याकरिता हा अभिनव उपक्रम राबविण्याचा निर्णय धारणी तहसीलदार डॉ. संघमेश कोडे यांनी घेतला. मतदान केंद्राध्यक्ष म्हणून अपर्णा मरसकोल्हे, मतदान अधिकारी-१ माधुरी व्हेराटे, मतदान अधिकारी-२ सरला ठेंग व मतदान अधिकारी-३ अनिता सेलेकर यांनी कर्तव्य बजाविले. महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी हा प्रयोग राबविण्यात आला. त्याचे सकारात्मक परिणाम मिळाल्याची महिती तहसीलदार संघमेश कोडे यांनी दिली. या आदिवासीबहुल गावात दुपारी दीड वाजेपर्यंत ४७ टक्के मतदान झाल्याची माहिती तालुका निवडणूक अधिका-यांनी दिली. निवडणूक प्रक्रियेवर नायब तहसीलदार अजिनाथ गाजरे हे बारकाईने लक्ष ठेवून होते.
मेळघाटात महिलांची ‘पोलिंग पार्टी’, राज्यातील पहिला प्रयोग
By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2017 7:57 PM