राजुराबाजार/वरूड (अमरावती) : वरूड तालुक्यातील वाडेगाव येथे जादूटोण्याच्या संशयावरून जिवे मारण्याची धमकी दिल्याची घटना उघडकीस आली. वरुड पोलिसांनी या प्रकरणी मांत्रिकासह चौघांना अटक केली. न्यायालयाने चौघांनाही २८ फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.प्राप्त माहितीनुसार, आरोपी व फिर्यादी नातलग आहेत. याप्रकरणी फिर्याद देणा-या काकाने गायीचे दूध आटविल्याचा संशय आरोपी पुतण्यांनी घेतला होता. मांत्रिकाच्या सांगण्यावरून आरोपींनी काकासोबत वाद घातला आणि जिवे मारण्याची धमकी दिली. यासंदर्भात काकाने मांत्रिकास विचारणा केली असता, त्याने दिव्य शक्तीचा दाखला देत, त्रास दिल्यास मंत्रविद्येने मारून टाकीन, अशी धमकी दिली.यासंदर्भात फिर्यादी कैलास माणिक जाधव यांनी वरूड पोलिसांत तक्रार दाखल करीत हकिकत सांगितली. त्याच्या आधारे वरूड पोलिसांनी मांत्रिक दिलीप पांडुरंग जांभूळकर (४९), आकाश गजानन जाधव (२२), प्रतिभा गजानन जाधव (५५), राहुल गजानन जाधव (२०, सर्व रा. वाडेगाव) यांच्यावर भादंविचे कलम २ (ख), ३ अनुसूची ६, ८, महाराष्ट्र जादूटोणा विरोधी अधिनियम २०१३ सहकलम ५०४, ५०६ भादंविप्रमाणे गुन्हे नोंदवून अटक केली. सर्व आरोपींना २८ फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या घटनेचा तपास ठाणेदार गोरख दिवे, जमादार उमेश ढेवले यांच्या मार्गदर्शनात वरूड पोलीस करीत आहेत.
जादूटोण्याचा संशय, मांत्रिकासह चौघांना अटक, आरोपींना न्यायालयीन कोठडी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2018 6:02 PM