अपघाताला आमंत्रण : प्रशासनाचे दुर्लक्ष
मोर्शी : शहरातून गेलेल्या नांदगाव पेठ ते वरूड सिमेंट रस्त्याचे बांधकाम जवळपास दीड वर्षाआधी पूर्णत्वास गेले. मात्र, मोर्शी येथील नळा नदीवरील पुलाचे बांधकाम अर्धवट स्थितीत रखडले आहे. पुढे जाणारा रस्ता हा समोर गेलेल्या रस्त्याला जोडला गेला नाही. त्याच ठिकाणाहून डावीकडे श्रीक्षेत्र पाळा, सालबर्डी मार्गाकडे वाहने मार्गक्रमण करीत असताना तेथे अनेक अपघात घडले आहेत.
राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभाग अमरावतीच्या देखरेखीखाली या सिमेंट रोडचे बांधकाम पूर्णत्वास गेले. मोर्शी ते वरूड या राष्ट्रीय महामार्गावरील नळा नदीजवळ पुलाचे काम अर्ध्यावर सोडून समोर पुन्हा रस्ता सुरू करण्यात येऊन पूर्ण करण्यात आला. अर्ध्या पुलाचे काम तसेच सोडण्यात आल्याने रात्री बेरात्री वरूड मार्गे येणाऱ्या वाहनचालकांना हा रस्ता अपूर्ण असल्याचे लक्षात येत नसल्याने या ठिकाणी धान्यसाठा असलेला मोठा ट्रक खड्ड्यात उलटला. सुदैवाने कोणत्याही प्रकारची प्राणहानी झाली नाही. तसेच वरूड, अमरावती व वरूड चिंचोली गवळीकडे जाणारी कार या खड्ड्यात पडल्याने कारमधील जखमींना अमरावती येथील खासगी रुग्णालयात उपचार घ्यावा लागला. जयस्वाल नामक तरुण दुचाकीसह खड्ड्यात पडल्याने त्याचा पाय फॅक्चर झाला. अशाप्रकारे अनेक अपघात याठिकाणी घडत असून, या पूल वजा रोडचे बांधकाम पूर्णत्वास गेले नाहीतर तेथे मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
तांत्रिक प्रक्रियेचा अडसर
सुरुवातीला राष्ट्रीय महामार्ग विभाग अमरावतीच्यावतीने हा रस्ता सरळ मंजूर करण्यात आला होता. नंतर येथे रुंदीकरणाच्या दृष्टिकोनातून बाजूने पुन्हा वळविण्यात आला. त्यामुळे एका शेतकऱ्याची अर्धा एकर जमीन रोडवरील पुलाखाली जात होती. त्यामुळे या पुलाचे बांधकाम थांबविण्यात आले. परिणामी या पूल वजा रस्ता बांधकामाचा मुद्दा जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात पोहोचला. जो प्रस्ताव पहिल्यांदाच मंजूर करण्यात आला होता, तो प्रस्ताव तसाच ठेवून पूल वजा रस्ता तयार करण्यात यावा. असे ठरविण्यात आल्याचे समजते. त्या पूल वजा रस्त्याचे बांधकाम त्वरित करण्यात यावे, अशी मागणी नगर परिषदेचे उपाध्यक्ष आप्पा गेडाम यांनी केली.
-------------