येवदा : दर्यापूर तालुक्यातील येवदा येथील भाग क्र. २ मधील शेतकऱ्यांनी येवदा ते ईटकी रस्त्यावरील शहानूर नदीचा पूल, रपटे, रस्त्याचे काम तातडीने करण्याची मागणी करीत ९ ऑगस्ट रोजी प्रहार संघटनेच्या नेतृत्वात आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. २० वर्षांपासून पूल, रस्त्याची मागणी कायम आहे. त्यासाठी वेळोवेळी निवेदने, स्मरणपत्रे संबंधित विभागाकडे सादर केली आहेत. शेतकऱ्यांना पायाभूत सुविधा पूरविण्यात आल्या नसल्याने शेतीच्या वहिवटीकरिता जाता येत नाही. पावसाळ्यात अतिवृष्टी झाल्याने रस्तांची दुर्दशा झाली असून शेतकरी, बैलजोडी, शेतमजूर, ट्रॅक्टर रस्ताने नेता येत नाही. त्यामुळे अर्धेअधिक शेतजमीन पडीक राहत आहे. यामुळे पिकांचे नुकसान होऊन शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला आहे.
प्रहारचे प्रदीप वडतकर व शेतकऱ्यांनी तहसीलदार योगेश देशमुख यांना निवेदन सादर केले. सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद बांधकाम विभागालासुद्धा निवेदन दिले आहे. त्यानुसार, ९ ऑगस्ट रोजी दुपारी ४ वाजता येवदा ग्रामपंचायतीपुढील गांधी चौकात आंदोलन छेडण्याचा इशारा प्रदीप वडतकर, निळकंठ गणवीर,मकसुद अली, आसिफ अली शमशेर अली यांच्यासह शेतकऱ्यांनी दिला आहे.