अमरावती : जिल्ह्यातील अमरावती-नागपूर आठ राष्ट्रीय महामार्गाच्या विस्तारकरणाचे काम अनेक वर्षांपासून गेल्या तीन ते साडेतीन वर्षांपासून सुरू आहेत. या महामार्गाच्या कामातील कंत्राटदारांची मनमर्जी आणि संबंधित विभागाच्या दुर्लक्षामुळे या मार्गावरून आवागमन करणाऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
जिल्ह्यामध्ये आठ प्रमुख महामार्ग असून, नांदगावपेठ-पांढुर्णा राज्य मार्ग, बऱ्हाणपूर-चांदा, अकोट-बैतुल, धामणगाव-यवतमाळ, अमरावती-चांदूर रेल्वे, मुलताई-वर्धा यांचे काम पूर्ण होऊन त्यावर वाहतूक सुरू झाली आहे. अमरावती-नागपूर राष्ट्रीय महामार्ग, समृद्धी महामार्गाचे काम जिल्ह्यात सुरू आहे.
समृद्धी महामार्गाचे अमरावती जिल्ह्यात ७४ किलोमीटरचे काम सुरू आहे. हा महामार्ग नांदगाव खंडेश्वर चांदुर रेल्वे धामणगाव रेल्वे यातील तालुक्यातून ४६ गावातून गेला आहे. ८० टक्के या महामार्गाचे काम पूर्ण झाले आहे त्यात ५७ किलो मीटर चे कॉंक्रिटीकरण पूर्ण तर सतरा किलोमीटरचे काम प्रगतिपथावर आहे. या महामार्गावर चोऱ्याचे प्रमाण अधिक वाढले असून आतापर्यंत २५ तक्रारी मंगरूळ दस्तगीर, दत्तापूर, तळेगाव दशासर, नांदगाव खंडेश्वर या पोलीस ठाण्यात नोंद आहे. नांदगाव खंडेश्वर परिसरात सुलतानपूर येथे असलेल्या एनसीसी कंपनीतील कर्मचाऱ्यांना या परिसरात दररोज स्थानिक गुंड धमक्या देत असल्याच्या तक्रारी नांदगाव खंडेश्वर पोलीस ठाण्यात नोंदवल्याची माहिती एनसीसी कंपनीचे व्यवस्थापक नीरजकुमार यांनी दिली.
समृद्धी महामार्ग
नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गासाठी ८ हजार ३६४ हेक्टर जमिनीचे अधिग्रहण पूर्ण झाले आहे. या महामार्गाचे बांधकाम १६ टप्प्यात पूर्ण होत असून सुमारे ६० टक्क्यांपेक्षा जास्त रस्त्याचे बांधकाम पूर्ण झाले आहे. महामार्गाच्या बांधकामासोबतच जलसंधारणालाही प्राधान्य देण्यात आले असून जिल्ह्यातील ३८ नाल्यांचे ९१ हजार २१० मीटर लांबीचे खोलीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे महामार्गासोबतच जलसमृद्धीदेखील झाली आहे.
हा महामार्ग वाहतुकीसाठी खुला होताच नागपूर आणि मुंबई या दोन शहरांमधील अंतर अवघ्या आठ तासांत पूर्ण करता येणार आहे.
------------------------
अमरावती ते नागपूर राष्ट्रीय महामार्ग
राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे अकोल्यातून अमरावतीपर्यंत सुरू झालेले काम तूर्तास रखडले आहे. अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील दहीगाव ते बडनेराबाहेरील बायपासपर्यंत आलेला हा राष्ट्रीय महामार्ग तळेगाव ते अमरावतीदरम्यान चारपदरी होऊन वाहतूकदेखील सुरळीत झाली आहे. तथापि, अमरावती ते अकोला मार्गावरील अरुंद, काठाने खोदून ठेवलेले रस्ते व त्यावरील खड्डे कायम आहेत.
--------------
वाशीममध्ये काय घडले, याबद्दल मला माहिती नाही. पण, आम्हा शिवसैनिकांच्या मनात बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाबाबत कसलाही संशय नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अलीकडच्या दौऱ्यात समृद्धी महामार्गावर आम्ही सर्व शिवसैनिक उपस्थित होतो. प्रगतीच्या वाटांमध्ये अडथळा नको, हे धोरण सुरुवातीपासून शिवसेना राबवित आहे.
- सुनील खराटे, शिवसेना जिल्हाप्रमुख
---------------
मागास म्हणून शिक्का असलेल्या वऱ्हाडाचा भाग समृद्धी महामार्गाने मुंबई या आर्थिक केंद्राशी जोडला जाणार आहे. त्यामुळे दळणवळण जलद होईल. आमच्याकडच्या शेतमालाला बाजारपेठ मिळेल, याहून आणखी काय हवे? माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा महत्त्वाचा प्रकल्प आणून विदर्भाला समृद्धीच्या मार्गावर नेले आहे.
- निवेदिता चौधरी, जिल्हाध्यक्ष, भाजप