फोटो - फिनले पी १४
२१ जुलैचा अल्टिमेटम, आम्ही मिल सुरू करणार, व्यवस्थापनाला इशारा
अनिल कडू
परतवाडा : फिनले मिल सुरू करा. कामगारांच्या हाताला काम द्या. कामगारांची उपासमार थांबवा। ही मागणी घेऊन फिनले मिलचे कामगार चांगलेच आक्रमक झाले.
जवळपास तीनशे कामगारांनी शुक्रवारी सकाळी मिलमध्ये प्रवेश केला. मिल तात्काळ सुरू करण्याची मागणी तेथे उपस्थित लेबर ऑफिसर विपिन मोहने यांच्याकडे त्यांनी केली. वाटल्यास आम्हाला सहा महिने पगार देऊ नका, पण कच्चा माल आणा आणि मिल सुरू करा, असा प्रस्तावही त्यादरम्यान कामगारांनी लेबर ऑफिसरसमोर ठेवला.
मिलच्या जनरल मॅनेजरने येऊन आमच्यासोबत चर्चा करावी, अशी आग्रही मागणी यादरम्यान कामगारांनी लावून धरली. तब्बल चार तासानंतर जनरल मॅनेजर आले. त्यांच्यापुढे कामगारांनी आपल्या व्यथा मांडल्या. मिल सुरू करा, अन्यथा २१ जुलैपासून आम्ही सर्व कामगार स्वतःहून कामावर मिलमध्ये येऊ, असे कामगारांनी त्यांना संगीतले. यादरम्यान अचलपूर पोलीसही उपस्थित होते.
फिनले मिलमध्ये एकूण ८९९ कामगार आहेत. यातील ३१० स्थायी कामगार, तर ४८२ बदली कामगार आहेत. या कामगारांना फिनले मिल व्यवस्थापनाने पंधरा महिन्यांपासून पूर्ण वेतन दिलेले नाही. अनेकांच्या हाताचे कामही हिसकावून घेतले. काही कामगारांना तर वेतनच मिळालेले नाही.
-------------
कामगारांचा संघर्ष
लॉकडाऊनमुळे मार्च ते १७ मे २०२० पर्यंत हा उद्योग बंद होता. १७ मे रोजी लॉकडाऊन संपले, पण व्यवस्थापनाने ३१ डिसेंबर २०२० पर्यंत मिल बंद ठेवली. यादरम्यान मिल सुरू करण्यासह कामगारांना पूर्ण वेतनाच्या मागणीसाठी तब्बल १११ दिवस कामगारांनी उपोषणही केले.
---------------
वस्त्रोद्योग मंत्र्यांची मध्यस्थी
तत्कालीन वस्त्रोद्योग मंत्री स्मृति इराणी यांच्या आदेशान्वये जानेवारी २०२१ पासून मिल सुरू केली गेली. पण, कच्च्या मालाचे कारण पुढे करीत मिल व्यवस्थापनाने ती लागलीच बंद केली. मागील काही महिन्यांपासून ही मिल बंद आहे.
--------
प्रकरण कामगार आयुक्तांकडे
कामगारांच्या प्रश्नांसह मिल वारंवार बंद ठेवण्याच्या कारणावरून गिरणी कामगार संघाच्यावतीने जनरल सेक्रेटरी विलास चावरे यांनी लेबर कमिशनरकडे प्रकरण दाखल केले आहे. यावर २० जुलैला निर्णय होणे अपेक्षित आहे.