वीरेंद्र जगताप : बांधकाम कामगारांच्या मेळाव्यात आवाहन धामणगाव रेल्वे : बांधकाम कामगारांसाठी विविध योजना असल्या तरी या योजनांचा लाभ सर्वसामान्य कामगारांना मिळत नाही़ प्रशासनाने आपली गती वाढवून कामगारांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ द्यावा, असे आवाहन आ़ वीरेंद्र्र जगताप यांनी केले़ धामणगाव रेल्वे शहरातील शेतकरी भवन येथे बांधकाम कामगारांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता़ अध्यक्षस्थानी आ़वीरेंद्र जगताप, तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषद सदस्य मोहन पाटील, बाजार समितीचे माजी सभापती श्रीकांत गावंडे, रमेश राठी, नितीन कनोजिया, सुनील मुंधडा, वसंत देशमुख, चंदू डहाणे यांची उपस्थिती होती़ महाराष्ट्र इमारात व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळ यांच्यावतीने बांधकाम कामगाराकरिता पूर्वीपासून विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येत आहेत़ विविध नमुण्यातील अर्ज मागील वर्षात ९० दिवस काम केल्याचे नियोक्ताने ग्रामसेवक किंवा मुख्याधिकारी यांच्या स्वाक्षरीचे प्रमाणपत्र, वयाचा पुरावा नोंदणी शुल्क असे अर्ज केला तर बांधकाम कामगारांना विविध योजनांचा लाभ मिळत असल्याची माहिती आ़ वीरेंद्र जगताप यांनी यावेळी भाषणातून दिली़ कामगार कुटुंबप्रमुखांच्या पत्नीच्या प्रसूतीकरिता १५ हजार, कामगारांच्या मुलाकरिता शैक्षणिक अर्थसहाय्य, पदवी, वैद्यकीय, अभियांत्रिकी शिक्षणासाठी अर्थसहाय्य, कामगाराच्या मुलीच्या जन्मानंतर कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केल्यास एक लाख रुपये, अशी योजना आहे़ परंतु योजनांचा आवश्यक तेवढ्या प्रमाणात प्रचार-प्रसार न झाल्याने बांधकाम कामगार योजनांचा लाभ घेऊ शकत नाहीत, असेही आ. वीरेंद्र जगताप यावेळी म्हणालेत. विविध योजनांतर्गत बांधकाम कामगाराला ७५ टक्के अपंगत्व आल्यास २ लाख रुपये, बांधकाम कामगारांच्या विधवा पत्नीस २४ हजार रुपये अर्थसहाय्य प्राप्त होते़ यांसह विविध योजना असून बांधकाम कामगारांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन आ़वीरेंद्र जगताप यांनी केले़ आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक काँग्रेसचे शहराध्यक्ष वसंत देशमुख, संचालन व आभार प्रदर्शन नगरसेवक चंदू डहाणे यांनी केले़ तब्बल १ हजार बांधकाम कामगारांनी मेळाव्यात नोंदणी केली़ या अनुषंगाने बांधकाम कामगारांचे संघटन होत आहे. (तालुका प्रतिनिधी)
बांधकाम कामगारांनी घ्यावा योजनांचा लाभ
By admin | Published: August 19, 2016 12:21 AM