लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : युतीच्या जागावाटपात बडनेरा अन् तिवसा विधानसभा मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला गेला. पाच वर्षे तयार केलेल्या पिचवर दुसराच कोणी बॅटिंग करणार, ही भावनाच भाजप कार्यकर्त्यांना अस्वस्थ करीत आहे. ‘हेचि फळ काय मम तपाला?’ ही बोचरी खंत कार्यकर्ते उघडपणे बोलत आहेत. एकूणच परिस्थिती पाहता प्रचारादरम्यान उमेदवारांची कसोटी लागणार असल्याचे चित्र आहे.बडनेरा मतदारसंघाचा आढावा घेता, आमदार रवि राणा अन् भाजपचे सन २०१४ मधील उमेदवार तुषार भारतीय यांच्यात मतदारसंघातील बहुतेक विकासकामांवरून झालेली तू-तू-मैै-मै महानगराने अनुभवली. यामध्ये कोणी तसूभरही हटले नाही. उमेदवारीचा जोरकस दावा करणारे भाजपचे प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी यांंनीदेखील मतदारसंघाची बांधणी केली. मतदारसंघ भाजपच्याच वाट्याला, असे ठामपणे सांगण्यात आले असतांना शिवसेनचा उमेदवार घोषित झाला.शिवसेनेतही सर्व काही ‘ऑलवेल’ नाही. जिल्हाप्रमुख सुनील खराटे यांच्यासह अन्य काही पदाधिकाऱ्यांनी बडनेरा मतदारसंघासाठी प्रबळ दावा केला होता. मात्र, उमेदवारी प्रीती बंड यांना जाहीर झाली आहे. सद्यस्थितीत खराटे समर्थक अलिप्त दिसत आहेत. माजी आमदार संजय बंड यांनी या मतदारसंघात बांधणी केली होती. सन २०१४ मधील निवडणुकीत त्यांचा थोडक्या मतांनी पराभव झाला. संजय बंड यांच्या आकस्मिक मृत्यूनंतर पत्नी प्रीती बंड याच खºया दावेदार असल्याचे बंड समर्थकांनी दाखवून दिले.सन २०१४ मध्ये अचलपूर मतदारसंघात भाजपचे उमेदवार दुसºया क्रमांकावर होते. या मतदारसंघात माळी समाजाची गठ्ठा मते आहेत. मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला गेला असल्याने डावलण्यात आल्याची समाजभावना आहे. येथे भाजपचे जिल्हा सरचिटणीस गजानन कोल्हे व सुधीर रसे यांनीदेखील प्रबळ दावा केला होता. यामुळे भाजपचे कार्यकर्ते अस्वस्थ असल्याचे दिसून येत आहे.
तिवस्यात सेनेसह भाजपमध्ये खदखदमुख्यमंत्र्याद्वारे राज्यात काढण्यात आलेल्या महाजनाधार यात्रेची सुरुवातच मुळी तिवसा मतदारसंघातून करण्यात आली. यानिमित्त काँग्रेसच्या या गडात भाजपने जोरदार शक्तिप्रदर्शन केल्याने मतदारसंघ भाजपचा, ही आशा मात्र जागावाटपात फोल ठरली. पराभवाची खंत न बाळगता भाजपच्या प्रदेश सचिव निवेदिता चौधरी यांनी मतदारसंघाची बांधणी केली होती. त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे. जिल्हा शिवसेना स्थापनेपासून अविरतपणे कार्य करणारे व यावेळी प्रबळ दावा केलेल्या दिनेश वानखडे यांना डावलून जिल्हाप्रमुख राजेश वानखडे यांना उमेदवारी जाहीर झाल्याने तिवस्यातील शिवसैनिक अस्वस्थ आहेत.