अमरावती : गत काही दिवसांपूर्वी ‘नीट’ परीक्षेत झालेल्या घोटाळ्यानंतर आता राज्य शासनाच्या प्रवेश नियामक प्राधिकरणाने शैक्षणिक वर्ष २०२४-२०२५ मधील विविध व्यावसायिक केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेत (सीईटी) सुसूत्रता आणण्यासाठी सकारात्मक पाऊल उचलले आहे.
त्यानुषंगाने प्रवेश प्रक्रियेशी संबंधित घटकांची विदर्भस्तरीय कार्यशाळा मंगळवार, २५ जून रोजी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात आयोजित करण्यात आली आहे. या कार्यशाळेत व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या सीईटी प्रवेशाबाबत एकसूत्रता निश्चित केली जाणार आहे.राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष तथा प्रवेश नियामक प्राधिकरणाचे आयुक्त दिलीप सरदेसाई यांच्या मेलनुसार व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या सीईटी प्रवेशाबाबत नागपूर व अमरावती या दोन विभागांसाठी ही कार्यशाळा होणार आहे. यात कुलगुरू, कुलसचिव, विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांशी निगडीत संचालक, विभागीय सहसंचालक, महाविद्यालयांचे अधिष्ठाता, प्राचार्य यांना आमंत्रित करण्यात आले आहे. त्यानुसार प्रवेश नियामक प्राधिकरणाद्वारे ई-मेल पाठविण्यात आले आहेत.
राज्य प्रवेश नियामक प्राधिकरणाच्या निर्देशानुसार व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या सीईटी प्रवेशासंदर्भात विदर्भस्तरीय कार्यशाळेच्या आयोजनाबाबत तयारी करण्यात आली आहे. यात नागपूर व अमरावती विभागातील प्रवेशाबाबत यंत्रणांचा सहभाग राहणार आहे.- डॉ. अविनाश असनारे, कुलसचिव, अमरावती विद्यापीठ.