गणेश वासनिक
अमरावती : वाढती लोकसंख्या, शहरीकरण, जंगलतोड, औद्योगिकरण, वनजमिनीवर अतिक्रमण, गुरांची वाढती संख्या आणि कुरणक्षेत्राची जागा मनुष्य वस्त्यांनी बळकावल्यामुळे वनांवर त्याचा ताण वाढला आहे. म्हणूनच जंगलाचे कमी होणारे प्रमाण हा चिंतेचा विषय आहे. पर्यावरण संतुलित ठेवण्यासाठी एकूण भूभागाच्या ३३ टक्के वनाचे प्रमाण असणे आवश्यक आहे. भारतात हे प्रमाण २० टक्के म्हणजे प्रतिकूल आहे. जल, जमीन व जंगल यांच नात अतिशय घट्ट आहे. वने आहेत म्हणून नद्यांना पाणी आहे. वने आहेत म्हणून मानवाला प्राणवायू मिळतो. म्हणजे वनामुळेच मानव प्राणी जीवन जगत आहेत. मात्र बेसुमार वृक्षतोडीमुळे देशात दररोज ३५ हेक्टर जंगल कमी होत असल्याचे वास्तव आहे.
भारतात एकूण १४ प्रकारची वने आढळतात. महाराष्ट्रात सात प्रकारची वने आहेत. विदर्भात आर्द्र व शुष्क पानगळी आणि काटेरी खुरटी वने मोठ्या प्रमाणात आढळतात. १८५३ मध्ये ब्रिटीश सत्ता आल्यानंतर बेरार प्रांतात १८६५ मध्ये वन विभागाचे कामकाज सुरू झाले. स्वातंत्र्यानंतर १९६४ पूर्व मेळघाट, पश्चिम मेळघाट, अमरावती, बुलढाणा वनवृत असे भाग करण्यात आले. विदर्भातील पेंच, नवेगाव, ताडोबा, मेळघाट, बोर, नागझिराच्या दाट वनात वनसंपदा आढळते, तर अमरावतीनजीक पोहरा मालखेड राखीव जंगल परिसरात खैर, हिवर, पळस, बोर प्रकारचे वृक्ष आढळून येतात. वाशिम जिल्ह्यातील कारंजा सोहोळ अभयारण्य कुरण व काटेरी खुरट्या प्रकारात मोडते. विदर्भातील जंगलात वाघ, बिबट, रानकुत्रा, तडस, कोल्हा, रानमांजर, उदमांजर, अस्वल, गवा, चितळ, सांबर, नीलगाय, काळवीट हे प्राणी आहेत. महाराष्ट्रात एकूण सहा राष्ट्रीय उद्याने, ५३ अभयारण्ये, १८ संवर्धन क्षेत्र असे क्षेत्र संरक्षित आहेत. तसेच ६ व्याघ्र प्रकल्प आहेत. मध्य प्रदेश, अरुणाचल प्रदेश, छत्तीसगडनंतर वनक्षेत्रात महाराष्ट्र चौथ्या क्रमांकावर आहे.