ऑनलाईन कलाकृती सादरीकरण, वारली पेंटिंग, थंब पेंटिंग, पक्ष्यांसाठी वाॅटर फीडरचे प्रशिक्षण
अमरावती : जिल्हा विज्ञान केंद्रांच्यावतीने शनिवारी ‘दुनिया बोलक्या बाहुल्यांची’ या शैक्षणिक उपक्रम अंतर्गत विद्यार्थ्यांना वारली पेंटिंग, थंब पेंटिंग, पक्ष्यांसाठी वाॅटर फीडरचे ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात आले. लॉकडाऊनमध्ये विद्यार्थ्यांना उन्हाळ्यात काही तरी वेगळे करता यावे, यासाठी अगस्ता इंटरनॅशनल फाऊंडेशनने पुढाकार घेऊन हा उपक्रम राबविला.
अमरावती, चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ, नागपूर येथील जिल्हा विज्ञान केंद्रांनी विद्यार्थी, बालकांसाठी ‘दुनिया बोलक्या बाहुल्यांची’ हा अभिनव उपक्रम सुरू केला आहे. यात विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात येत आहे. शाळा बंद असल्याने विद्यार्थी, बालकांच्या उपजत कलागुणांना वाव मिळण्याचे व्यासपीठ उपलब्ध नाही. ते उपलब्ध करण्यासाठी हा शैक्षणिक उपक्रम राबविला जात आहे.
जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या विषय सहायक दीपाली बाभूळकर यांनी बोलक्या बाहुल्यांचे प्रशिक्षण दिले. त्या विदर्भातील एकमेव बाहुलीनाट्य कलावंत असून, ‘चिंकीची दुनिया’ या बाहुलीनाट्य उपक्रमाच्या माध्यमातून शैक्षणिक, सामाजिक, आरोग्यविषयक जनजागृतीपर कार्यक्रम राबवितात.
कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य मिलिंद कुबडे यांनी केले. प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे अधिव्याख्याता संजीवकुमार खाडे, समीर मुळे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाला ३७५ पेक्षा जास्त विद्यार्थी जुळले. दीपक देशमुख, प्रीती तांडेकर, पूजा चौधरी, श्रद्धा राऊत व प्रांजली ठेंगणे यांनी आयोजनाकरिता परिश्रम घेतले.