अमरावती : नवीन वर्षात कोरोनाने कहरच केला आहे. किंबहुना, फेब्रुवारी महिन्यात दरदिवशी संक्रमित रुग्णसंख्या वाढत आहे. शुक्रवारी उच्चांकी ५९८ कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. आतापर्यंत २७ हजार ९२१ संक्रमित रुग्णांची नोंद आरोग्य यंत्रणेने केली आहे. दिवसभरात एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. एकूण मृत्युसंख्या ४६३ एवढी झाली आहे.
मार्च २०२० पासून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सुरू झाला असला तरी नवीन वर्षात संक्रमित रुग्णसंख्येने अनेक उच्चांक गाठले आहे. वाढत्या कोराेना रुग्णसंख्येमुळे हल्ली जिल्हा आरोग्य यंत्रणा पुरती हादरून गेली आहे. जिल्हाधिकारी शैलेश नवाल, महापालिका आयुक्त प्रशांत रोडे हे दोेन्ही प्रमुख अधिकारी शुक्रवारी थेट रस्त्यावर उतरले आणि कोरोना नियमांचे नागरिकांनी पालन करावे, यासाठी कठोर झाल्याचे दिसून आले. गृह विलगीकरणातील रुग्णांवर करडी नजर ठेवण्यासाठी संपूर्ण यंत्रणा सज्ज झाली आहे. मास्कचा वापर, शारीरिक अंतर आणि सार्वजनिक स्थळी गर्दी होणार नाही, याचे पालन करण्यासाठी ‘ॲक्शन प्लॅन’ तयार करण्यात आला आहे. आरोग्य यंत्रणेच्या माहितीनुसार, शुक्रवारी ८६१ रुग्ण उपचारासाठी दाखल आहे. १०१ रुग्ण कोरोनावर मात करून बरे होऊन घरी परतले. ॲक्टिव्ह रुग्ण २७८३ एवढे असून, रिकव्हरी रेट ८८.४९ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. मृत्युदराची १.६२ टक्के नोंद झाली आहे. हा दर तूर्तास स्थिर आहे.
गृह विलगीकरणात महापालिका क्षेत्रातील ८८०, तर, ग्रामीण भागातील ८८० कोरोना रुग्ण आहेत. ‘कोरोना पिकेट’ भागातून कोरोना संक्रमित रुग्ण अधिक प्रमाणात आढळून येत असल्याने त्याच नागरी भागाला प्रशासनाने उपाययोजनांसाठी लक्ष्य केले आहे.